परिस्थिती आणि कौटुंबिक कारणांमुळे गणितात रस असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात खंड पडला. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेने धनंजय गुप्ता आणि दाभेलीकर यांना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय गणित परिषद काही भरीव काम करू शकली तर परिषदेचे सार्थक होईल, या शब्दात संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुणकुमार शेळके यांनी आजच्या शिक्षणावर एकार्थाने भाष्य केले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा होतात मात्र, प्रायोजकत्व मिळवण्यापलीकडे नेमके कोणी काय केले आणि अशा परिषदा व परिसंवादाचे नेमके योगदान ही बाब गुलदस्त्यात राहते. कदाचित ती जाणीव असल्यानेच अ‍ॅड. शेळके यांनी गणिताची आवड असलेल्या धनंजय गुप्ता याला कौटुंबिक कारणांमुळे व परिस्थितीमुळे इतर विद्याशाखांकडे वळावे लागले तर दाभेलीकर याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. पण, पैशाअभावी त्याचेही शिक्षण अर्धवट राहिले. संस्थेने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार उचलला असून त्या दोघांनाही शिवाजी विज्ञान महाविद्यालयात निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेत दीड लाख विद्यार्थी, २७० शाळा व महाविद्यालये आणि सहा हजार कर्मचारी वर्ग आहे. मात्र, शाळा महाविद्यालयात गणिताचे शिक्षक नाहीत, अशी खंत अ‍ॅड. शेळके यांनी व्यक्त करीत, या परिषदेच्या माध्यमातून संस्थेला गणिताचे शिक्षक लाभावेत, अशी त्यांची अपेक्षा होती.
प्रसिद्ध गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त इझेत बायसल विद्यापीठ बोलुतुर्की आणि गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुटतर्फे ‘गणित’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुणकुमार शेळके होते. उद्घाटन डॉ. विजय भटकर यांनी केले.  
परदेशातील एका कंपनीच्या बजेट एवढा खर्च भारतात उच्च शिक्षणावर होत असल्याचे सांगून हा खर्च अतिशय अल्प असून तो वाढवण्याची गरज असल्याचे डॉ. विजय भटकर यांनी स्पष्ट केले.
डॉ. टी.एम. करडे यांनी खेडय़ातल्या मुलांना इंग्रजी येत नाही मात्र, गणित चांगले कळते. आपल्याकडील उपजत ज्ञान इंग्रजीत दिले जात असल्याने विविध ज्ञान शाखा विकसित झाल्या नाहीत. रवींद्रनाथ टागोर आणि सी.व्ही. रामन यांच्यानंतर चांगले संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.गायकवाड पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुटचे अध्यक्ष मोहन गायकवाड, डॉ. टी.एम. करडे आदींची भाषणे झाली.