विदर्भ आणि मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागात दुष्काळ असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानीत झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भोजनावळी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा देत कुठलाही कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नागपूर महापालिकेत आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहे. या महोत्सवासाठी महापालिकेत निविदा काढण्यापूर्वीच अनेक राष्ट्रीय पातळीवरील कलावंतांचे कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली.
स्थानिक स्वराज्य करामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी महापालिका प्रशासनाला बरीच कसरत करावी लागत आहे. निधीअभावी अनेक विकास कामे थांबली आहे. स्थानिक स्वराज्य कर रद्द होणार असल्यामुळे व्यापाऱ्यांनी या महिन्यात कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत कमी झाला असताना दुसरीकडे मात्र नागपूर महोत्सवावर वारेमाप खर्च केला जात आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दरवर्षी मुख्यमंत्र्यासहीत विविध मंत्री आणि राजकीय पक्षातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. मात्र, हा खर्च टाळण्यासाठी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता कुठलाही कार्यक्रम न करण्याचे फर्मान काढले आणि ठरविलेले सर्व कार्यक्रम रद्द केले. एकीकडे राज्याने एक आदर्श घालून दिलेला असताना दुसरीकडे मात्र महापालिका महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमावर कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. या महोत्सवासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांना आमंत्रित करण्यात आले असून महोत्सवासाठी निविदा काढण्यापूर्वीच त्यांचे कार्यक्रम निश्चित करून त्यांना रक्कम देण्यात आली आहे. एकीकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे महिना संपत आला तरी वेतन होत नाही तर दुसरीकडे कलावंतांवर लाखो रुपये खर्च केले जात असल्याची भावना महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महोत्सवासाठी सेलिब्रिटीला आमंत्रित करण्यासाठी निविदा काढल्या जातात. यावेळी १७ डिसेंबरला निविदा मागविण्यात आल्यानंतर आज त्या उघडण्यात येणार होत्या.
मात्र, त्यापूर्वी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, गायक सुखविंदरसिंग यांना कार्यक्रमासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पावसामुळे न झालेला मान्यवर कवींचा कार्यक्रम पुन्हा यावर्षी आयोजित करण्यात आला आहे आणि त्यात गेल्यावर्षीच्याच कवींना आमंत्रित करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम ठरविण्यासाठी महापालिकेने एका संबंधीत व्यक्तीला कलावंत ठरविण्याचे कंत्राट दिले असताना महापालिका प्रशासनाकडून निविदा काढण्याचा देखावा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर महोत्सवावर ५ ते ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यासाठी गेल्यावर्षीच्या इव्हेंट कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी त्याला आधीच ७५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात आली आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना कार्यक्रमासाठी ही ७५ टक्के रक्कम देण्याचे आौदार्य दाखविण्यासाठी महापालिकेने कुठून पैसा आणला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.