डोंबिवली पश्चिमेत सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकामे तसेच चोरीच्या नळजोडण्यांमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी बारावे जलशुद्धीकरण येथे अतिरिक्त पंप बसविण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे महासभेत देण्यात आली. डोंबिवलीतील पाणीटंचाईवर अतिरिक्त पंपाचा हा उतारा कितपत प्रभावी ठरतो, याविषयी मात्र वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत.
डोंबिवली पश्चिमेत ३० हजारांहून अधिक चोरीच्या नळजोडण्या काही भूमाफियांनी घेतल्या आहेत. त्या तोडण्यात याव्यात म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही आपल्या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही, अशी तक्रार सभागृह नेते रवी पाटील यांनी महासभेत केली. आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडून कुलकर्णी यांचे लाड सुरू असल्याने ते कोणाचे ऐकत नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली. प्रकल्प विभागाचे अभियंता म्हणून कुलकर्णी सीमेंट रस्त्यांची कामे पाहत आहेत. या कामांचा वेगही मंदावला आहे. कुलकर्णी ठेकेदारांचे हित सांभाळतात, अशीही टीका पाटील यांनी केली. तसेच तरुण जुनेजा या अभियंत्याकडे पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार देण्याची मागणी केली. अरविंद मोरे यांनीही त्याला दुजोरा दिला. कल्याण पूर्वेत खंकाळ या ठेकेदाराला जुलै २००९ मध्ये जलवाहिन्या दुरुस्तीचे काम १८ कोटी ६८ लाखांना प्रशासनाने दिले. हे काम जानेवारी २०११ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. प्रशासनाने या ठेकेदाराला गुपचूप ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली. अद्याप १५ टक्के काम शिल्लक असताना महापालिकेने खंकाळ ठेकेदाराचे १६ कोटी रुपयांचे देयक अदा केले आहे. यामुळे कल्याण पूर्वेत पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी महासभेत दिली.
कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना दररोज प्रतिमाणसी २५० लिटर पाणी मिळणे आवश्यक असताना सध्या ते फक्त १२८ लिटर मिळत असल्याची माहिती प्रशासनातर्फे महासभेत देण्यात आली. या आठवडय़ापासून पाणीटंचाईच्या निषेधार्थ नगरसेवक श्रेयस समेळ, वामन म्हात्रे हे उपोषणाला बसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
डोंबिवलीतील पाणीटंचाईवर अतिरिक्त पंपाचा उतारा
डोंबिवली पश्चिमेत सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. अनधिकृत बांधकामे तसेच चोरीच्या नळजोडण्यांमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी बारावे जलशुद्धीकरण येथे अतिरिक्त पंप बसविण्यात येईल,
First published on: 19-12-2012 at 03:17 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extra water pump medicine on dombivali water shortage