कॅनडासारख्या प्रगत देशात यशस्वी झालेली एखादी यंत्रणा भारतात आणायला हरकत नाही. बेस्टच्या प्रवाशांना त्याचा आनंदच होईल. मात्र कॅनडातील एखादीच यंत्रणा उचलून येथे आणायची आणि कर्मचाऱ्यांच्या माथी मारायची पण अन्य बाबींकडे दुर्लक्ष करायचे हे कसे चालेल? कॅनडातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वेळापत्रक इथे आणायचे, तेथील कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यक्षमतेची अपेक्षा आपल्या चालक-वाहकांकडून करायची. परंतु तेथील सोयीसुविधा, विश्रांती, जेवण व अन्य सुविधांची मात्र बरोबरी करायची नाही, असे कसे चालेल? वाहक- चालकांकडून विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाच्या पाश्र्वभूमीवर वडाळा आगारातील तथाकथित विश्रांतीगृहातील सुविधांचा केलेला हा पंचनामा-
विश्रांतीची अपुरी व्यवस्था, अस्वच्छ उपाहारगृह, नाक मुठीत धरूनही जाता येणार नाही अशी स्वच्छतागृहे.. हे चित्र आहे कॅनेडियन वेळापत्रकाचा पहिला प्रयोग झाला त्या वडाळा आगारातील. या आगारातून मुंबईभर बसेस जातात. दिवसभरात सुमारे हजारबर चालक-वाहकांचा येथे राबता असतो. पण सुविधांच्या नावाने मात्र तेथे बोंबच आहे. मुंबईतील सगळ्यात जास्त गजबज असलेल्या आगाराची ही स्थिती. मग मुंबईतल्या अन्य आगारांची कल्पनाच केलेली बरी!
‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांना भावलेले कॅनेडियन वेळापत्रक सर्वप्रथम वडाळा आणि ओशिवरा आगारांमध्येप्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले. त्यानंतर हळूहळू १२ आगारांमध्ये याच वेळापत्रकानुसार चालक-वाहक आपापली कामे करीत आहेत. पहाटे तीन ते रात्री ११ या वेळेत वडाळा आगारात सुमारे १४२ बसगाडय़ा येत-जात असतात. दिवसभरात सुमारे एक हजार चालक-वाहकांची या आगारात वर्दळ असते. काही चालक-वाहक बसगाडय़ा घेऊन येतात, तर काही जण बाहेर जात असतात. बसगाडय़ा घेऊन येणाऱ्या वाहक-चालकांना थोडावेळ विश्रांती घेता यावी यासाठी आगारातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात १२- १५ बाकडी टाकण्यात आली आहेत. विश्रांती घ्यायची म्हणजे या बाकडय़ांवरच लवंडायचे. काही वेळा विश्रांतीसाठी येणाऱ्या चालक-वाहकांची संख्या जास्त असते. पण मर्यादित बाकडय़ांमुळे बऱ्याचजणांच्या नशिबी तेवढेही सुख नसते. भरीस भर म्हणजे या विश्रांती कक्षात साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. हात-पाय धुण्याची वा अंघोळीचीही सोय नाही. कार्यालयाच्या स्वच्छतागृहाचाच वापर चालक-वाहकांना करावा लागतो. तेही स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने नाक मुठीत घेऊनच तेथे जावे लागले. येथे अंघोळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओले कपडे वाळविण्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना आपले ओले कपडे विश्रांती कक्षातच वाळत घालावे लागतात.
आगारातील उपाहारगृहाची तर तऱ्हाच वेगळी. उपाहारगृहाची जागा प्रशस्त असली तरी गर्दीच्या वेळी अनेकांना उभ्यानेच जेवावे लागते. हे उपाहारगृह अस्वच्छतेचे आगार बनले आहे. कायम विचित्र गंध आणि टेबलांवरील अस्वच्छतेमुळे तेथे भोजन अथवा नाश्ता करण्याचे मन होत नाही. त्यामुळे घरून सोबत आणलेला जेवणाचा डबा चालक-वाहक विश्रांती कक्षातच बसून खाणे पसंत करतात. कॅनेडियन पद्धतीचा श्रीगणेशा झालेल्या वडाळा आगारामध्ये विश्रांतीच्या या तथाकथित व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. थोडय़ाफार फरकाने अशीच अवस्था बेस्टच्या सर्वच आगारांमध्ये आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी बेस्टची अनेक छोटी टर्मिनस आहेत. या टर्मिनसमधील कक्षात विश्रांती करण्यासाठी उपलब्ध बाकडय़ांवर चालक-वाहकांना संगीत खुर्ची खेळावी लागते. भायखळा पश्चिमेच्या टर्मिनसचे उदाहरण यासाठी बोलके आहे. या टर्मिनसवरून १६४, १७२, ६३ आणि १५६ या चार क्रमांकाच्या बस जात-येत असतात. येथे विश्रांतीसाठी केवळ चार बाकडय़ांची व्यवस्था आहे. एकाच वेळी तेथे सुमारे १० ते १२ चालक आणि वाहक उपस्थित असतात. स्वाभाविकच धड एकालाही आराम करता येत नाही. संतापाची बाब म्हणजे या टर्मिनसमध्ये प्रसाधनगृहाची व्यवस्थाच नाही. त्यामुळे चालक-वाहकांना लघुशंकेसाठी भायखळा रेल्वे स्थानक गाठावे लागते. उपाहारगृहाचा तर तेथे पत्ताच नाही. आसपासची हॉटेले अथवा गाडय़ांचाच चालक-वाहकांना आधार असतो. मलबार हिलसारख्या उच्चभ्रू वस्तीमधील कमला नेहरू पार्क टर्मिनसचीही अशीच अवस्था आहे.