प्रचंड उकाडा, वादळी वारे, पावसाळी वातावरण अन् निरभ्र झालेले आकाश असे होते सोमवारचे करवीर नगरीतील निसर्गचित्र. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी पावसामुळे दिलासा मिळेल, असे वाटत होते. पण पावसाने हुलकावणी दिल्याने भ्रमनिरास झाला.   
गेल्या तीन-चार दिवसांत कोल्हापुरातील तापमानात वाढ होत आहे. दुपारनंतर घराबाहेर पडणेही मुश्किलीचे बनले आहे. सोमवारी तर सकाळपासूनच हवेतील वाढलेला उष्मा चांगलाच जाणवत होता. दुपारी अंगाची लाही लाही होत होती. तीन वाजल्यानंतर मात्र वातावरणात अचानक फरक पडला. वादळीवारे शहरभर घोंघावत राहिले. काही काळातच आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. थंड वारे सुटले होते.त्यामुळे पाऊस सपाटून पडणार असेच वाटत होते. अध्र्या तासात तेही चित्र पालटले. आकाशातील काळे ढग निघून गेले. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता मावळली. तथापि हवेतील उष्मा काही प्रमाणात कमी झाल्याचा दिलासा मात्र मिळाला.
‘आयआरबी’ची कमान कोसळली
सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आर.के.नगर येथील टोल नाक्याच्या कमानीचा मोठा फलक कोसळला. आयआरबी कंपनीने टोल वसुलीसाठी बांधलेल्या टोल नाक्याच्या कमानीचा फलक कोसळल्याने तेथे टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. आयआरबी कंपनीने रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लावली आहे. किमान टोल नाक्याच्या कमानीतरी व्यवस्थित बांधायला हव्या होत्या. आयआरबीच्या एकूणच कामाचा दर्जा सिद्ध झाला आहे. या घटनेमुळे जीवितहानी झाली असती. त्यामुळे आयआरबीकंपनीच्या विरोधात फौजदारी दावा दाखल करावा, अशी तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येणार असल्याचे बाबा इंदूलकर यांनी पत्रकारांना सांगितले.