श्रीगोंदे तालुक्यातील लिंपणगाव येथे काल मध्यरात्री चोरटय़ांनी मध्यवस्तीत दरोडा टाकला. चोरटय़ांनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत वृध्द माजी सैनिक नारायण तुळशीराम बडवे (वय ८२) यांचे निधन झाले. मारहाणीत त्यांची पत्नी पार्वती (वय ७५) या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. तालुक्यातील गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आज सकाळीच नगरच्या दौऱ्यावर आले. ते जिल्ह्य़ात येण्यापुर्वी काही तास ही घटना घडली. या घटनेमुळे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याच तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेनंतर लिंपणगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिकांनी मृतदेह उशिरापर्यंत ताब्यात घेतला नव्हता.
शेवटी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनीता ठाकरे यांनी गावक-यांची समजूत घालुन तपास लावण्याचे अश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.
माजी सैनिक नारायण बडवे व त्यांची पत्नी हे दोघेच घरात राहतात. मध्यरात्री त्यांना कोणी तरी हाक मारली. आवाज ओळखीचा वाटला म्हणुन त्यांनी दरवाजा उघडताच तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करण्यात आला, त्यात ते जागीच गतप्राण झाले. नंतर दरोडेखोर घरात शिरले. त्यांच्या अवाजाने जाग्या झालेल्या पार्वती बडवे यांच्या डोक्यावर व अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केले, त्यात त्या गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडल्या. दरोडेखोरांनी नंतर घरात सर्वत उचकापाचक करून घरातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रूपयांचा एैवज चोरून नेला आहे. मागील महिन्यात घारगाव येथेही असाच दरोडा पडला होता, त्यातही एकाला प्राण गमवावे लागले.