तालुक्यातील कुडूस येथे प्रियदर्शनी ऊर्फ मानस सहकारी संस्थेने उद्योग उभारण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या २० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जागेत आतापर्यंत कोणताही उद्योग उभारण्यात न आल्याने संबंधित शेतकऱ्यांनी गुरुवारी या जागेचा ताबा घेत त्यात भाताची पेरणी व नांगरणी केली.
उद्योग उभारण्याचे कारण देत प्रियदर्शनी संस्थेने वाडा तालुक्यात २० वर्षांपूर्वी ३०० एकर जमीन खरेदी केली आहे. मात्र या कालावधीत येथे एकही कारखाना उभारला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेली दोन वर्षे शेतकरी त्यासाठी संघटितपणे लढा देत आहेत. गुरुवारी अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे राज्यसचिव अशोक सिब्बन, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन भातपेरणी केली.