शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. दलाल मात्र मस्तवाल होतात. ‘माल त्याचे हाल, चोरटे खुशाल’ ही पद्धत यापुढे चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
हुतात्मा स्मृती यात्रेनिमित्त गुरुवारी पाटील लातुरात आले होते. पत्रकार परिषदेच्या वेळी प्रा. शेषराव मोहिते, कालिदास …आपेट, राजकुमार सस्तापुरे उपस्थित होते. महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्य़ातील वसगडे (तालुका पलूस) या  गावापासून स्मृती यात्रेस प्रारंभ झाला. १२ डिसेंबरला बाबू गेनू स्मृतिदिनी पुणे जिल्ह्य़ातील गलांडवाडी (तालुका इंदापूर) येथे यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंत विविध शेतकरी आंदोलनात २७ जण हुतात्मे झाले आहेत. यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, या साठी स्मृतियात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सी रंगराजन समितीच्या शिफारशी लागू केल्यास ऊसउत्पादकांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही. ७० टक्के रक्कम कारखान्यांनी उत्पादकांना द्यावी व उर्वरित ३० टक्क्य़ांत सर्व खर्च भागवावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आपोआपच आळा बसणार आहे. आयात, निर्यातीचे धोरण मुक्त असले पाहिजे. कारखाना उभारणीसाठी १५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी, लेव्हीचा कोटा बंद करावा, रिलीज मेकॅनिझम बंद व्हावे, या प्रमुख मागण्या असल्याचे पाटील म्हणाले.
उसाबरोबरच कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही आपण लक्ष देणार असून भुसार मालाला ३ टक्के व भाजीपाल्याला ६ टक्के इतकीच आडत दिली गेली पाहिजे. राज्याचे पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे धरसोड वृत्तीचे धोरण आखून खिसा भरून घेतात. मूठभर आडत्याच्या दबावाला शासन बळी पडणार असेल तर राज्यातील शेतकरी गप्प बसणार नाही. आडत्याच्या हिताचे धोरण राबविले गेले तर पणन संचालकांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपापसातील संमतीने ज्याप्रमाणे बालविवाह करता येत नाही, त्याच पद्धतीने हमीभावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांचा माल कोणालाही खरेदी करता येणार नाही, असा कायदा व्हायला हवा व त्यासाठी शेतक री संघटना संघर्ष करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.