चिखली येथील कृषी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली मालतारण योजना फसवी ठरू लागली आहे. योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वी शासकीय गोदामात सोयाबीन ठेवल्यानंतर गोदाम पावतीवर बोजा चढवूनही त्यांना कर्ज मिळाले नाही. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती अशोक पडघान व सचिवांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली आहे.  
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने महाराष्ट्र राज्य पणन महासंघ संलग्नित शेतमाल तारण योजना राबविण्याचे हंगामापूर्वीच जाहीर केले होते. या योजनेची व्यापक प्रमाणात जाहिरात केली होती. शेतकऱ्यांच्या हिताचे भाव लक्षात घेता सोयाबीनसाठी केवळ अकरा-बारा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर ही योजना निधीअभावी बारगळल्यातच जमा आहे. सुरुवातीला वाटप केलेली कर्ज रक्क म पणन महासंघाकडून मिळाली, मात्र ती अन्य कामांवर खर्च करण्यात आली. या योजनेसाठी ती रक्क म राखीव ठेवण्यात आली नाही. परिणामी, सध्या कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
योजनेसाठी तालुक्यातील महिमळ येथील सुदाम पांडूरंग येवले, ईसोली येथील एकनाथ बळीराम भुसारी, आन्वी येथील पंजाब पवार यांनी शासकीय गोदामात सोयाबीन ठेवून गोदाम पावतीवर कर्जाची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली. त्यावर या गोदाम पावतीवर बोजा चढविण्यासंदर्भाचे पत्र बाजार समितीने संबंधित शेतकऱ्यांना दिले. त्यानुसार बोजा चढवून आणल्यानंतरही गेली दोन महिने या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना प्रबळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्यात बाजार समितीचे सभापती अशोक पडघान  आणि सचिव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
यासंदर्भात पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.