भविष्याची गरज लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करून पूनद धरणातील पाण्यावर हक्क प्रस्थापित करावा अन्यथा तालुक्यात धरणे असूनही पाण्याशिवाय शेती उद्ध्वस्त होईल, असा इशारा आ.जे. पी. गावित यांनी दिला आहे.
तालुक्यातील गणोरे येथे तापी पाटबंधारे विभागामार्फत तालुक्यातील धरणातील पाणी मिळण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करून पाण्यावरील हक्क प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आ.गावित होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज परिवर्तन संस्थेचे भरत कावळे, माकपचे कळवण तालुका सरचिटणीस हेमंत पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. मोरे आदी उपस्थित होते.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चणकापूर उजव्या कालव्याच्या ३८ किलोमीटर कार्यक्षेत्रापैकी २८ किलोमीटर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी नको असे लेखी दिल्याने पाटाची लांबी वाढली आहे. त्यामुळे ते पाण्याचा हक्क गमावून बसले आहेत, असे गावित यांनी नमूद केले. कालव्याचे कॉंक्रिटीकरण नसल्याने पाणी झिरपून विहिरीत पाणी उतरले, तोपर्यंत ठीक आहे.
परंतु भविष्यात ज्या भागापर्यंत पाट पोहचला आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करून शासनाकडे पाण्याची मागणी केल्यास शासन त्यांना पाणी देईल व त्यांच्यापर्यंत पाणी पोहचावे म्हणून कालवा कॉंक्रिटीकरण केला जाईल. परिणामी तुमच्या विहिरीला पाणी येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पूनद धरण परिसरात असे घडू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाटचाऱ्यांना विरोध न करता गावोगावी पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, धरणातील प्रत्येक थेंबावर आपला हक्क प्रस्थापित करावा, असे आवाहन गावित यांनी केले. राजकीय नेता म्हणून पाण्यावर राजकारण करण्यासाठी आपण येथे आलेलो नाही.  इथून मागे पाण्याचे राजकारण कसे करण्यात आले, याच्याशीही आपणास देणेघेणे नाही. तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. भविष्यात टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने काळाची गरज लक्षात घेवून कळवण तालुक्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करून आपले पाणी आजच आरक्षित करावे अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. पाण्याची मागणी तुम्ही केली तर तुम्हाला पाण्यासाठी कोणापुढेच हात पसरावे लागणार नाहीत. प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहचले तर पाण्या प्रमाणे शेतकरायंना पिकांचे नियोजन करता येईल, असेही गावित यांनी सांगितले.
यावेळी ‘पाणी वापर व नियोजन’ विषयावर समाज परिवर्तन संस्थेचे भरत कावळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने स्थापन केलेल्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष केदा बहिरम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला दह्य़ाणे दिगरचे सरपंच बेबीलाल पालवी, अॅड. भाऊसाहेब पवार, संतोश देशमुख आदी
उपस्थित होते.
कन्सारा पाणी वापर संस्था पिंपळा व गणोरे, साधकेश्वर पाणी वापर संस्था देसगाव व धनेर, सप्तशंृती पाणी वापर संस्था मोकभणगी, गुंजावणी पाणी वापर संस्था धनेर व दरेभरणगी या नव्याने स्थापन झालेल्या चार पाणी वापर संस्थांचा सत्कार आ. गावित यांच्या हस्ते करण्यात आला.