अवर्षण, नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. नव्या वर्षांतील पहिल्या चार महिन्यात जिल्ह्य़ातील तीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्य़ात गेल्या वर्षी २०१२ मध्ये १५३ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
गेल्या चार पाच वर्षांपासून बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्य़ाचे सरासरी पर्जन्यमान आठशे मिलीमीटरवरून घटून हे अडीचशे मिलीमीटरवर आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात नापिकीचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यावर्षी खरीप पिकांमध्ये पन्नास टक्के घट झाली. रब्बी पिकांचा नव्वद टक्के पेराच झाला नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात घाम गाळला, मात्र त्यांच्या पदरी कमी उत्पन्नाने निराशाच आली. नापिकी व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्य़ातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. सन २०१३ च्या पहिल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल चौवीस शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे आपली जीवनयात्रा संपविली. गेल्या चार महिन्यात जिल्ह्य़ात तीसहून अधिक आत्महत्या झाल्याचा आकडा असून ही संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासनाचे आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ाासाठी असलेले पॅकेज हे फसवे असून त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस अशी पाऊले उचलू शकलेले नाहीत. गेल्या वर्षी जिल्ह्य़ातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. जिल्ह्य़ात आतापर्यंत पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी केवळ ५२६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. सुमारे साडेनऊशेहून अधिक प्रकरणे सरकारी यंत्रणांनी अपात्र ठरविली आहेत. जिल्ह्य़ातील शेतकरी आत्महत्यांचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करून सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व वारसदारांना शासनाने भरीव मदत करावी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers suicide in drought effected buldhana district
First published on: 03-05-2013 at 02:57 IST