रास्त भाव दुकानांचे परवाने व केरोसीन वाटपात जिल्हापुरवठा अधिकारी भिकाजी घुगे यांनी केलेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या ४२ मुद्दय़ांची तातडीने चौकशी करावी, या मागणीसाठी हिंगोलीचे ज्ञानेश्वर धायगुडे, शेख मीर कासीम, बाळासाहेब शिंदे व इतरांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. येथील उपोषण कार्यकर्त्यांनी जिल्हापुरवठा अधिकोरी भिकाजी घुगे यांच्या भ्रष्ट व गैरकायदेशीर कार्यपद्धतीविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सोमवारपासून आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ज्ञानेश्वर धायगुडे यांनी दिलेल्या तक्रारीत २३ ऑगस्ट २०१० पासून प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे कळविले आहे. उपोषणार्थीनी जिल्हापुरवठा अधिकारी घुगे यांच्याविरुद्ध ४२ मुद्दे दिले आहेत. त्यामध्ये दक्षता समितीच्या झालेल्या बैठका, ५० ते १०० टक्के अनामत रक्कम जप्त करणे, परवाना निलंबित करणे, पर्यायी व्यवस्था केलेल्या दुकानांचा कार्यकाळ, निलंबित दुकाने पुनरुज्जीवित करणे, निलंबित दुकानांच्या पर्यायी व्यवस्थेचा कालावधी, अर्धघाऊकांच्या मूळ संचिका व त्यांच्यावर आतापर्यंत केलेल्या कारवाया, १७ किरकोळ केरोसीन विक्रेत्यांवर १५० केरोसीन दुकानदारांची जबाबदारी, कळमनुरी गोदाम जळाल्याचे प्रकरण, असे एकूण ४२ मुद्दे चौकशीकरिता तक्रार निवेदनात दिले होते.