सर्पदंशावरील लस खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना दिली जाणार नाही या हेकेखोर निर्णयाशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर हे अडून बसल्याने गंभीर पेच निर्माण झाला आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतरही कुठलीही दयामया दाखवायला आरोग्य खाते तयार नसल्याने अनेक रुग्णांच्या भवितव्याचा प्रश्न कायम आहे.
आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आरोग्यमंत्र्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांनी जिल्हा परिषदेने लस खरेदी करावी म्हणून प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कान्हेगाव येथील विमलबाई छगन पावसे (वय ६५) या महिलेचा नुकताच सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यांच्यावरील उपचारादरम्यान सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्यासाठी नातेवाइकांना मोठी धडपड करावी लागली. त्या वेळी आरोग्य खात्याच्या बेफिकिरीचा अनुभव अनेकांना आला.
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कारभारी खरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा परिषदेला आता थेट लस खरेदी करता येत नाही. हाफकीन संस्थेकडूनही लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. लसीचा तुटवडा आहे. सरकारने जिल्हा सरकारी रुग्णालयाकडून लस घेण्यास सुचविले आहे. त्यांच्याकडून लस घेऊन आरोग्य केंद्रांना पुरवठा केला जातो. प्रत्येक आरोग्य केंद्राला पाच लसींचा पुरवठा होतो. प्रथमोपचारासाठी लागणारी मर्यादित लस उपलब्ध असते, त्यामुळे अडचणी येत आहेत असे ते म्हणाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निटूरकर म्हणाले, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आम्ही लसीचा वापर करतो. खासगी रुग्णालयातील रुग्णांना लस देताच येणार नाही. जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा आहेत. त्यांनी आमच्या रुग्णालयात दाखल व्हावे. अन्यत्र लस देणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे एका महिलेच्या मृत्यूनंतरही आरोग्य खात्याचे अधिकारी नियमावर बोट ठेवत असल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. श्रीरामपूर, नेवासे, राहुरी, राहाता या भागांत सर्पदंशाच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. दरवर्षी पावसाळय़ात अनेकांना सर्पदंश होतो. शहरातील संत लुक, साखर कामगार, लोणी येथील प्रवरा रुग्णालय, शिर्डी येथील साई सुपर स्पेशालिटी या रुग्णालयात सर्पदंशाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दाखल होतात. पण या रुग्णालयांना सर्पदंशाच्या लसीचा पुरवठा होत नाही.
शहरातील दोन रुग्णालयांत वर्षांला दीडशे ते दोनशे सर्पदंशाचे रुग्ण दाखल होतात. सर्पमित्र साप पकडून ते जंगलात सोडतात. जंगलात सोडलेले हे साप गोदावरी व प्रवरा नदीतून नदीकाठच्या भागातील गावात, शेतात घुसतात. या भागातील रुग्णांना नगरला सरकारी रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचे प्राण वाचण्याची शक्यता कमी असते. रुग्ण बेशुद्ध पडतो. विष अंगात भिनते, त्यामुळे मिळेल त्या जवळच्या रुग्णालयात जावे लागते. नगरला जाताना रुग्ण वाटेतच दगावण्याची भीती असते. त्यामुळे कुणी जोखीम पत्करत नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निटूरकर यांनी मात्र हे वास्तव अद्यापही स्वीकारले नाही. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सरकार रुग्णांना किती दिवस लसीकरिता गॅसवर ठेवणार असा प्रश्न आहे.