श्रीरामपूरला शेतकऱ्यांमध्ये नाराजी
तालुक्यातील रब्बी पिकांची नजर आणेवारी (पैसेवारी) आज जाहीर झाली. ५१ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त लागल्याने या गावांवर आता दुष्काळ निर्मूलनाच्या सुविधांपासून वंचित होण्याची वेळ आली आहे. अवघ्या ५ गावांची आणेवारी ही पन्नास पैशांपैक्षा कमी लागली आहे.
तहसीलदार अनिल पुरे यांनी आज नजर आणेवारी जाहीर केली. महांकाळवाडगाव, वडाळामहादेव, वांगी खुर्द, दीघी व गोंडेगाव या गावांची आणेवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमी आहे.
उर्वरित सर्व गावांची आणेवारी ही पन्नास पैशांपेक्षा जास्त आहे. आणेवारीबाबत ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी १५ दिवसांच्या आत त्या तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयाकडे कराव्यात, असे आवाहन करण्यात आले
आहे.
काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना तालुक्याची आणेवारी पन्नास पैशांपैक्षा जास्त लागल्याचे कळताच त्यांनी तहसीलदार पुरे यांच्याशी संपर्क केला. आता लोकांनी आणेवारीबाबत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन केले
आहे.
तालुक्यात भंडारदरा धरणाचे आवर्तन तब्बल चार महिन्यांनंतर आले. उभी पिके जळून गेली. तसेच अनेकांनी पिकेच घेतली नाही. तालुक्यात उभ्या उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. अपुऱ्या पावसामुळे व कालव्याचे आवर्तन लांबल्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. तसेच भविष्यात पाणी मिळण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकरी उसाचा खोडवा व निडवा नांगरून टाकत आहेत. आणेवारी काढण्याच्या काळात ही पिके उभी दिसत असली तरी महिनाभरात ही पिके नांगरली जातील. आणेवारी काढण्याच्या चुकीच्या पद्धतीची झळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसली आहे.
कृषी विभागाने पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने भाग घ्यावा म्हणून विशेष मोहिम राबविली. पण आता आणेवारी जादा आल्याने शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार आहेत. तसेच अन्य सवलतींचा लाभ मिळणार नाही. आणेवारी जादा लागल्याने तालुक्यात संताप व्यक्त केला जात
आहे. तालुक्यातील श्रीरामपूर, भैरवनाथनगर, खंडाळा, दत्तनगर, ब्राम्हणगाव वेताळ, बेलापूर, नर्सरी, उंबरगाव, वळदगाव, उक्कलगाव, एकलहरे, टाकळीभान, भोकर, कमालपूर, घुमनदेव, खानापर,वडाळा महादेव, खोकर, कारेगाव, खिर्डी, वांगी बुद्रुक, गुजरावाडी, मालुंजा बुद्रुक, भेर्डापूर, लाडगाव, पढेगाव, कान्हेगाव, मातापूर, निपाणी वाडगाव, निमगाव खैरी, नाऊर, रामपूर, जाफ्राबाद, नायगाव, मातूलठाण, उंदिरगाव, हरेगाव, माळेवाडी, सराला, गोवर्धन, कडीत, फत्त्याबाद, मांडवे, कुरणपूर व गळनिंब या गावांची नजर आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त लागली आहे.