नाशिकला सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असा समृध्द वारसा लाभला असून शहर अधिकाधिक ‘स्मार्ट’ होण्यासाठी नियोजन केले जात आहे. शहरातील प्रश्न त्वरीत सुटावे, नागरिकांना मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नये यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना काही अधिकार प्रदान करण्यात आले आहे. एचएएल विमानतळाच्या तिढय़ाबाबत संरक्षण मंत्र्याशी चर्चा सुरू आहे, कुंभमेळ्याचा खर्च राज्य सरकार उचलेल, अशी आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पवननगर येथे कै. लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील क्रीडा संकुलाचा नुतनीकरण शुभारंभ, जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह शहर व ग्रामीण कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट शहराची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेवर आधारीत प्रशासकीय कामकाजात अनेक बदल करण्यात आले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीने कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. शेती प्रक्रिया उद्योग, नव्या इमारतीसाठी लागणारा परवाना यासह अन्य काही कामांचे अधिकार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देण्यात आले आहे. जेणेकरून कामे जलद गतीने होतील. कमी वेळात नागरीकांना अधिकाधिक सेवा मिळतील याकडे लक्ष देण्यात येत आहे. या प्रक्रियेत कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. नारपार योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटणार आहे. एचएएल विमानतळावरील तिढा सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. या विमानतळावरून लवकरच विमान सेवा सुरू होईल. तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. राज्य सरकार हा खर्च करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील असे आश्वासन त्यांनी दिले.