अवास्तव बील दुरूस्तीसाठी लेखी तक्रार व मीटर तपासणीसाठी अर्ज केलेला असतानाही वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी महावितरणला पाच हजार रूपयांचा दंड मुंबई येथील विद्युत लोकपालांनी ठोठावला आहे.
कळवण येथील उद्योजक सुनील संचेती यांना त्यांच्या कळवण उपविभागातील वाणिज्यजोडणीचे ऑक्टोबर २००९ या महिन्याचे वीज बील सुमारे ३११०० युनिटचा वापर दाखवून एक लाख नव्वद हजार रूपये असे देण्यात आले होते.
संचेती यांनी बील अवास्तव असल्यामुळे दुरूस्तीसाठी लेखी तक्रार करून मीटर तपासणीसाठी अर्ज व पैसे भरले होते. मात्र वीज बील दुरूस्तीसाठी वारंवार मागणी करूनही महावितरणाने अडीच वर्षांत काहीही कारवाई न करता वीज पुरवठा खंडित करून वसुलीसाठी वकिलामार्फत नोटीस पाठवली.
यावर संचेती यांनी पिंपळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत मुथा यांच्या मदतीने अंतर्गत तक्रार कक्षाकडे एप्रिल २०१२ मध्ये तक्रार दाखल केली. कक्षाने विहीत दोन महिन्याच्या मुदतीत काहीही निर्णय न दिल्यामुळे जूनमध्ये त्यांनी वीज ग्राहक मंचाकडे गाऱ्हाणे मांडले. मंचाने तीन लाखाचे थकबाकीचे बील रद्द ठरवून सुधारित ७५२० रूपयांचे वीज बील देण्याचे आदेश दिले. ग्राहकाने या दराचे वीज भरल्यावर वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित केल्याची कारवाई बेकायदेशीर ठरवून त्वरित वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश मंचाने दिले.
मात्र मंचाने ४८ तासापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने होणारी भरपाई नाकारली होती.
संचेती यांनी त्यामुळे मुंबई येथील विद्युत लोकपाल यांच्याकडे अपील दाखल केले. लोकपालांनी ७५२० वीज बील रद्द ठरवून सुधारित सुमारे ५७०० रूपये बील देण्याचे तसेच वीज पुरवठा हा वीज प्रवाहाची सलगता तुटल्यामुळे नोव्हेंबर २००९ मध्ये खंडित झाला होता.
वीज पुरवठा १७ सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू झाल्याचे नमूद करून ग्राहकास झालेल्या त्रासासाठी महावितरणला पाच हजाराचा दंड करून हा दंड ग्राहकास भरपाई म्हणून बिलातून द्यावा असा आदेश दिला आहे. सुनावणीवेळी ग्राहकातर्फे जयंत मुथा आणि महावितरणतर्फे
कळवणच्या कार्यकारी अभियंत्यांनी बाजू मांडली.