मुलुंडच्या महात्मा गांधी रस्त्यावरच्या मुन्शी इस्टेट इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोकुळ रुग्णालय.. बुधवार रात्रीपर्यंत अत्यंत उत्तम स्थितीत असणाऱ्या या रुग्णालयाचा काही तासांतच कोळसा झाला होता. गुरुवारी दुपारी या इमारतीत शिरतानाच जळका वास नाकात शिरला. आग विझवण्यासाठी बुधवारी मध्यरात्री अग्निशमन दलाने फवारलेले पाणी गुरुवारी दुपापर्यंत इमारतीच्या जिन्यावरून खाली येत होते. त्या पाण्याबरोबरच राखही खालपर्यंत वाहत होती.
पहिल्या मजल्यावरील या रुग्णालयाबाहेरच्या वीजेच्या मीटरमध्येच शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. रुग्णालयात शिरताच आतील दृश्य पाहून अंगावर सर्र्कन काटा येत होता. आत फक्त कोळसा आणि राख एवढेच उरले होते. शिरल्याशिरल्या समोरच्याच चौकोनात औषधांचे दुकान होते, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे दुकान तर बेचिराख झाले होतेच; पण संपूर्ण रुग्णालयातील पंख्यांची पाती वाकली होती. काही पाती तुटली होती. या भागात असलेल्या सर्व तपासणी खोल्यांची राखरांगोळी झाली होती.
काही मजूर त्या ओल्या झालेल्या राखेतून जळलेल्या व्हिलचेअर्स, अर्धवट वाचलेल्या फायली, प्लायवूडचे तुकडे बाहेर काढून खाली टाकत होते. दोन इमारतींच्या मध्ये अशा अनेक जळलेल्या गोष्टींचा ढीग जमला होता. हे दृश्य खूपच भेसूर होते. काही वेळाने मुलुंड परिसराचे आमदार सरदार तारासिंग घटनास्थळी आले. त्यांनी राख झालेल्या रुग्णालयाची पाहणी केली. दुर्दैवाने रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी राहुल रुद्रवार हे या आगीच्या विळख्यात सापडून मृत्यूमुखी पडले. राहुल रात्री एका केबिनमध्ये झोपले होते. शॉर्ट सर्किट झाले तेथून जवळच ही केबिन होती. या केबिनचा कोळसा झाला होता. इमारतीच्या तळ मजल्यावरील  दुकानांच्या स्टोअर रुममध्येही आग पसरली होती. मात्र अग्निशमन दलाने तातडीने येथे पाणी फवारल्याने फार हानी झाली नाही. पण दुपारी उशिरापर्यंत दुकानदार दुकानातील जळके सामान आणि राख साफ करत होते. अग्निशमन दलाचे दोन अधिकारी दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा एकदा पाहणी करून गेले. त्यानंतर मग या भागात प्रसिद्ध असलेल्या ६० वर्षे जून्या गोकुळ रुग्णालयाचे बेचिराख अवशेष पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली.
नशीब बलवत्तर म्हणून..
मध्यरात्री आग लागली, त्या वेळी मी गोकुळ रुग्णालयाशेजारच्या आमच्या क्लिनिकमध्ये झोपलो होतो. शेजाऱ्यांनी दार ठोठावून मला आगीची माहिती दिली. आगीचे लोळ दिसत होते. आग हळूहळू आमच्या क्लिनिकच्या दिशेने सरकत होती. बाहेर जाण्याच्या वाटेवरच प्रचंड आग असल्याने बाहेर पडणे अशक्य होते. मी देवाचा धावा करत आमच्या क्लिनिकच्या आतल्या बाजूला जाऊन बसलो. थोडय़ा वेळाने आगीची धग जाणवू लागली. मृत्यू आगीच्या रूपाने तांडव करत असलेला दिसू लागला. पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली. मलाही त्यांनीच बाहेर काढले. पण अजूनही डोळ्यांसमोर ते आगीचे लोळ आहेत.
जवाहरसिंग परदेशी (आगीतून बचावलेले गृहस्थ)