कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्लायवूडपासून दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला दुपारी आग लागली. आगीमध्ये साहित्य व शेड भक्ष्यस्थानी पडले. औद्योगिक वसाहत, कागल नगरपरिषद व जवाहर कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. कारखान्यात सुमारे ३५ लाखाहून अधिक किमतीचे साहित्य होते. त्यापैकी १५ लाखाहून अधिक साहित्य जळाले असल्याची माहिती कारखान्याचे मालक दिनेश पटेल यांनी दिली.
पटेल यांच्या मालकीचा लक्ष्मी डोअर्स हा प्लायवूडपासून दरवाजे तयार करण्याचा कारखाना आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. लाकूड व तत्सम साहित्य असल्याने आगीने अल्पावधीत भीषण रूप धारण केले. यामुळे पटेल यांच्या कार्यालयाशेजारील प्लायवूड व इतर साहित्याने पेट घेतला. आग लागली तेंव्हा कारखान्यात पटेल यांच्या समवेत चार कामगार काम करीत होते. पटेल यांनी आग लागल्याची वर्दी दिल्यानंतर पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल नगरपरिषद व जवाहर कारखाना यांचे अग्निशमन दलाचे पाच बंब दाखल झाले. आग मोठय़ा प्रमाणात असल्याने पाणी कमी पडू लागले. त्यामुळे खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला पाचारण करण्यात आले. पटेल व कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील साहित्य बाहेर काढल्याने आग अधिक भडकू शकली नाही. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे व सहकारी दाखल झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
कागल औद्योगिक वसाहतीत प्लायवूड कारखान्याला आग
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्लायवूडपासून दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला दुपारी आग लागली. आगीमध्ये साहित्य व शेड भक्ष्यस्थानी पडले.

First published on: 16-01-2014 at 03:08 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to plywood factories in kagal industrial colony