दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असली तरी अनेकांनी त्यासाठी पोलीस आणि महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहरातील विविध भागात हजार ते बाराशेच्या जवळपास छोटी- मोठी फटाक्याची दुकाने असताना महापालिकेकडे केवळ ८९० दुकानदारांना सूचना पत्र देण्यात आल्याची नोंद आहे.
दिवाळीच्या पंधरा ते वीस दिवस शहरातील विविध भागात फटाक्यांची दुकाने थाटली जात असून त्यांना पोलीस आणि महापालिकेतर्फे रितसर परवानगी दिली जाते. फटाक्याच्या दुकानामुळे गेल्या काही वर्षांत लागलेल्या आगीमुळे ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी दुकानांसाठी जागा दिली जाते. तुळशीबाग, उत्तर नागपुरात इंदोरा चौकातील मैदानात, पश्चिम नागपुरात जयताळा परिसरात मध्य नागपुरात गांधीबाग परिसरातील मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, शहरातील फटाके विक्रेत्यांची संख्या बघता अनेकांनी मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहे. अनेकांनी महापालिकेची परवानगी न घेता महाल, गांधीबाग, सक्करदरा, लक्ष्मीभवन, गोकुळपेठ, इतवारी अशा वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहे. शहरात जवळपास १ हजार ते १२०० जवळपास छोटी मोठी फटाक्याची दुकाने असली तरी महापालिकेत मात्र केवळ ८९० फटाके विक्रेत्यांनी नोंदणी केली असून त्यांना सूचना पक्ष देण्यात आले आहे. वर्दळीच्या ठिकाणी फटाक्याची दुकाने लावू नये, असा नियम असताना अनेक लोकांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठेत फटाक्याची दुकाने थाटली आहे आणि त्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर मोठय़ा प्रमाणात फटाक्याची दुकाने असून त्या दुकानांच्या आजूबाजूला कपडय़ांसहीत फर्निचर, औषधांची दुकाने आहेत. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील अनेक फटाके विक्रेत्यांकडून वर्षभर फटाक्यांची विक्री केली जात असली तरी काही दुकानदारांनी मात्र खास दिवाळीनिमित्त दुकाने थाटली आहेत. बडकस चौक ते इतवारीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर अनेक फटाके विक्रेत्यांनी दुकाने लावली असून त्यातील अनेकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली. तुळशीबाग परिसरात फटाके विक्रेत्यांसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र, त्या तेथील जागा अपुरी असल्यामुळे अनेक दुकानदार जागा शोधण्यासाठी वणवण फिरत आहे. त्यांना जागा नसल्यामुळे वस्तींमध्ये दुकाने थाटली आहेत. अशा फटाके विक्रेत्यांवर ना पोलीस विभागाचे ना अग्निशमन विभागाचे लक्ष आहे.
या संदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी सांगितले, दिवाळीच्या दिवसात फटाक्याची विक्री करणाऱ्यांना पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असली तरी महापालिकेतर्फे त्यांना सूचना पत्र दिले जाते. सूचना पत्र दिल्यानंतर पोलीस परवानगी देत असतात. आतापर्यंत ८९० दुकानदारांना पत्र देण्यात आले आहे. शहरातील फटाके विक्रेत्यांची दुकाने बघता अनेक विक्रेत्यांनी परवानगी घेतली नाही, अशा विक्रेत्यांची चौकशी करणार असल्याचे उचके म्हणाले. शिवाय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या फटाके विक्रेत्यांकडे परवाना आहे याची चौकशी केली जाणार असून त्यानंतर
कारवाई केली जाईल, असही उचके म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecrackers dealers not paying attention towards rules regulations
First published on: 23-10-2014 at 08:28 IST