आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल-२ उभे राहिल्यानंतर मुंबई विमानतळ आता प्रगतीचा आणखी एक टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. मे महिन्याच्या अखेरीला या विमानतळावर पहिल्यांदाच अवाढव्य एअरबस विमान उतरणार आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले एअरबस विमान उतरवण्याचा मान सिंगापूर एअरलाइन्स या कंपनीला मिळणार असून मुंबई-सिंगापूर या मार्गावर हे विमान उडणार आहे. सध्या या मार्गावर बोइंग-७७७ हे विमान उडते.मुंबई विमानतळावरील नव्याकोऱ्या टर्मिनल-२चे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी झाल्यानंतर अगदी महिनाभरातच १ मार्चलाच नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) या विमानतळावर एअरबस-३८० उतरवण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. मात्र मुंबईच्या भूमीवर पहिल्यांदाच एअरबस उतरवण्याचा मान कोणत्या कंपनीला मिळेल, याबाबत काहीच स्पष्ट सांगण्यात आले नव्हते. मुंबई विमानतळावरील धावपट्टीची जागा कमी असल्याने एअरबस-३८० मुंबईत उतरण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र नवीन टर्मिनल उभारतानाच विमानतळावर रॅपिड टॅक्सीवेचे बांधकामही करण्यास सुरुवात झाली होती. आता मे महिन्याच्या शेवटी सिंगापूर एअरलाइन्सचे एअरबस-३८० मुंबईच्या धावपट्टीवर उतरणार आहे.
अवाढव्य!
एअरबस-३८० प्रवाशांच्या सेवेत आल्याने प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. किमान ५२५ आणि कमाल ८५३ आसनव्यवस्था असलेल्या या एअरबसमधील आसनेही प्रशस्त आणि ऐसपैस आहेत. बोइंग या अजस्र विमानापेक्षाही एअरबस मोठे असल्याने या विमानात प्रवाशांसाठी आणि केबिन क्रूसाठीही जास्त जागा आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी एअरबस-३८० हा नक्कीच आरामदायक अनुभव ठरणार आहे.