येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती आयोजित राज्यस्तरीय लावणीनृत्य स्पर्धेतील व्यावसायिक गटातील रोख रुपये २५ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोलापूरच्या नागेश साळुंखे निर्मित, ‘लावण्यखाणी’ने पटकावले.
येथील स्मृतिभवनात दि. १८ पासून या स्पर्धा सुरू झाल्या असून त्यामध्ये व्यावसायिक व पारंपरिक असे गट आहेत. व्यावसायिक गटात एकूण ८ संघांनी भाग घेतला होता. आज (शनिवार) पहाटे या गटातील स्पर्धेचा निकाल देण्यात आला. त्यामध्ये पुण्याच्या योगेश देशमुख निर्मित ‘तुमच्यासाठी काय पण’ व मुंबईच्या श्याम भगत निर्मित ‘भिंगरी’ या संघांना २० हजाराचे बक्षीस विभागून देण्यात आले. तर, तृतीय १५ हजाराचे बक्षीस मुंबईच्या माधुरी बडदे निर्मित ‘लावण्यस्मृती’ संघाला मिळाले. वैयक्तिक उत्कृष्टतेच्या बक्षिसामध्ये अदा गिजे (भिंगरी), मुजरा ‘तुमच्यासाठी काय पण’ यांना अनुक्रमे ५ व ३ हजाराची तर ढोलकीपटू नरेश कांबळे (लावणीसम्राट) पाश्र्वगायिका प्राजक्ता भडंगे (लावण्यखाणी), पेटीवादक उमा देवराज (लावण्यस्मृती) व तबलावादक रोशन कांबळे (भिंगरी) यांना प्रत्येकी १ हजाराची बक्षिसे मिळाली.
प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. या वेळी व्यासपीठावर निर्माते दिग्दर्शक संतोष कोल्हे, महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव, शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार विजेते पांडुरंग घोटकर, सरला नांदोरेकर व कमल जाधव आदी उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा. दत्ता बारबोले यांनी केले.