पशुधन जगविण्याचे धडक प्रयत्न
पावसाअभावी जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पशुधन वाचवण्यासाठी आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ४ महिन्यांत तब्बल ७ लाख १८ हजार लहान-मोठय़ा पशुधनाचे पालनपोषण करण्यात येत आहे. या काळात ५ कोटी ३७ लाख ५३ हजार २०० रुपये खर्च पशुधनावर करण्यात आला. या खर्चापैकी जिल्हा प्रशासनाला एक कोटी निधी प्राप्त झाला. आणखी ४ कोटी ३७ लाख ५३ हजार २०० रुपयांचा निधी येणे बाकी आहे.
अल्प पावसामुळे जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून मोठय़ा, मध्यम व लघु प्रकल्पांत अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नाही. ऑक्टोबरनंतर जिल्ह्य़ात टँकरद्वारे वाडी-वस्ती, तांडय़ावर पाणीपुरवठा सुरू करावा लागला. शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी दोन्ही हंगाम हातचे गेले. जे काही उत्पन्न मिळाले त्यातही खर्च अधिक होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे पशुधनही धोक्यात सापडले.
आष्टी तालुक्यात पाण्याअभावी पशुधन जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला. या स्थितीत दौलावडगाव, पिंपळा, कडा, पिंपळा, लोणी, पारोडी, शिंदेवाडी येथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. पाली (तालुका बीड), उमापूर (गेवराई), जाटनांदूर (शिरूर) व डोंगरकिन्ही (पाटोदा) येथे प्रशासनाने पाहणी करून चारा छावणी सुरू केली.
जिल्ह्य़ातील १० छावण्यांसाठी आतापर्यंत ५ कोटी ५७ लाख ५३ हजार २०० रुपये खर्च केला. पैकी केवळ एक कोटी रक्कम प्राप्त झाली. उर्वरित ४ कोटी ३७ लाख ५३ हजार २०० रुपये रक्कम आणखी आवश्यक आहे.