मुरमाडीतील तीन बहिणीचे हत्याकांड
आज मुरमाडीतील तीन बहिणीच्या हत्याकांडांचा १८ वा दिवस, तसेच गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तीन दिवसात आरोपी जेरबंद होतील, हे सांगण्याचा तिसरा दिवस असल्यामुळे सर्वाची उत्सुकता ताणली गेली असताना आज या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांची नावे मात्र अजूनही जाहीर झाली नाहीत.
या दरम्यान, या हत्याकांड प्रकरणी उभारण्यात आलेल्या कृती समितीच्या मंडपात उपोषणकर्ते माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांनी तीन मुलींची आईमाधुरी बोरकर, मुलींचे आजोबा व आजी यांना निमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान आईने या प्रकरणात सी.बी.आय. चौकशीची मागणी केली. सध्या तपासकर्त्यांच्या जोडीला या विभागातून सेवानिवृत्त झालेले, तसेच बदलून गेलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तपासाला लागले आहेत. या सोबतच तपासात पोलिसांकडून झालेल्या अनेक चुकांबद्दलही जोरात चर्चा सुरू आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीनही मृतदेह शवविच्छेदनाकरिता आली असताना जिल्हा शल्यचिकित्सकांना पोलिसांनी केलेला पंचनामा न मिळाल्यामुळे १७ तास ते मृतदेह तसेच पडून होती. ते कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. डायटोन चाचणीकरिता मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमधील ग्रँड मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये मृतांचे पाठविलेले हाड कोरडे पाहिजे होते, ते सोडियम क्लोराईडमध्ये भिजवलेले होते. त्यामुळे ते परत पाठविण्यात आले. त्यानंतर चंदिगडला देखील फॉरेन्सिक लॅबला काही गोष्टी पाठविण्यात आल्या होत्या.