नागपुरातील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांसाठी जिल्हा क्रीडांगणावर सैन्य भरतीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सैन्य भरतीत अकोला, भंडारा, नागपूर व वाशिम जिल्ह्य़ातील पाच हजार युवक सहभागी झाले होते. या सर्व युवकांची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
येथे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित केलेला आहे. भारतीय सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पाच हजार बेरोजगार युवक पहिल्याच दिवशी भरतीत सहभागी झाले होते. सोल्जर, जनरल डय़ुटी क्लार्क, सोल्जर टेक्निकल, नर्सिग असिस्टंट, ट्रेसमन, अशा विविध पदांसाठी ही भरती आहे. अकोला, भंडारा, नागपूर व वाशिम जिल्ह्य़ातील युवकांसाठीही भरती घेण्यात आली. त्यासाठी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड येथे युवकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे सकाळी क्लब ग्राऊंड परिसरात हजारो युवकांची गर्दी उसळलेली होती. भरती प्रक्रियेला सुरुवात होताच लगेच आपला क्रमांक लागावा म्हणून हजारो युवक रात्रीपासूनच या परिसरात मुक्काम ठोकून होते. बहुतांश युवकांनी रेल्वे व बस स्थानकाचा आधार घेतला, तर काही युवक न्यू इंग्लिश हायस्कुल, विश्रामगृह, डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसरात मुक्कामाला होती.
पहाटेच्या वेळी भरती प्रक्रिया सुरू होताच युवकांचा जथ्था क्लब ग्राऊंडवर दाखल व्हायचा. तेथे प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर शारीरिक चाचणीसाठी जिल्हा क्रीडांगण येथे पाठविण्यात आले. तेथे धावणे, उंच उडी, उंची, वजन व इतर शारीरिक चाचण्या करून लेखी परिक्षेसाठी त्यांची निवड करण्यात यायची. २ डिसेंबरला अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ातील युवकांसाठी झाली. युवकांनी दहावी, बारावीची गुणपत्रिका, मूळ प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, सरपंच व पोलीस पाटलांचा दाखला, पदविका, प्रमाणपत्र, एलसीसी, एबीसी प्रमाणपत्र, १६ रंगीत छायाचित्रे सोबत आणावयाची होती.
सैनिक पदासाठी वयोमर्यादा साडेसतरा ते २१ वष्रे, तर इतर पदांसाठी २३ वर्षे असून उंची १६८, तर वजन ५० किलो असणे आवश्यक होते. अनुसूचित जमातीसाठी उंची १६२, तर वजन ४८ किलो होती.