राजकीय मंडळी म्हणजे केवळ आश्वासनांचा पाऊस.. सगळेच एका माळेचे मणी.. या दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहिले जात असल्याने मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या तशी मोठी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग यंदा अभिनव उपक्रमाद्वारे प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणच्या सहकार्याने आयोगाने निवडणूक साक्षरतेसाठी निर्मिलेले ‘फ्लॅश कार्ड’ हे त्याचेच उदाहरण. मतदान का करावे, कशा पद्धतीने करावे आणि काय करू नये या बाबत पुस्तिकेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय पक्षांनी परस्परांना लक्ष्य करत प्रचाराची धग वाढविली आहे. प्रचारादरम्यान होणारे आरोप-प्रत्यारोप, दिली जाणारी वारेमाप आश्वासने, नवनिर्माणाच्या गप्पा या राजकीय पटावरील घडामोडींना कंटाळून त्याकडे दुर्लक्ष करणारा मोठा वर्ग आहे. एरवी राजकारण्यांच्या नावे खडे फोडायचे आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपला हक्क न बजाविता पर्यटन करायचे अशी या घटकाची कार्यशैली. वास्तविक, मतदान हा लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार असताना गेल्या काही वर्षांत मतदानाची टक्केवारी घसरत आहे. ही बाब नागरिकांची लोकशाही व मतदान प्रक्रियेबद्दलची उदासिनता अधोरेखित करते. या संदर्भात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्याकडून जनजागृती होत असली तरी निवडणूक आयोगाने यंदा मतदारांना मतदानासाठी साद घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. निवडणूक आयोग व राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाने निवडणूक साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. साक्षर व निरक्षर असे दोन्ही गट समोर ठेवत नागरिकांना अतिशय साध्या, सोप्या भाषेत मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
अशिक्षितांसाठी चित्रांचा आधार घेत या प्रक्रियेची माहिती ‘निवडणूक साक्षरता’ या तीस पानी पुस्तिकेतून देण्यात आली आहे. त्यात काही समर्पक घोषवाक्यही समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदान का गरजेचे आहे, तुमचे एक मत कसे परिवर्तन घडवू शकते याची जाणीव करून देतानाच ‘योग्य उमेदवाराची निवड करून आपल्या देशाविषयीचे प्रेम आणि कर्तव्य दाखवून द्या- आपल्या बुद्धीने मत द्या’ असे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाचा दिवस म्हणजे सार्वजनिक सुट्टीचा नाही. सर्वाना मतदान करता यावे म्हणून ही सुटी दिली जात असल्याची जाणीव पुस्तिका करून देते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाला जाताना काय काळजी घ्यावी, सोबत कोणती कागदपत्रे घ्यावीत, मतदान केंद्रावर कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविली जाते, शांततेत मतदान प्रक्रिया रा??बविण्यासाठी नागरिकांनी कसे सहकार्य करावे आदी तपशील पुस्तिकेत आहे. मतदान करताना कोणताही दबाव तसेच आमिषाला बळी न पडता स्वत:च्या बुद्धीने मतदान करावे, असे आवाहन पुस्तिकेतून करण्यात आले आहे.