गोवारी समाजातील निष्पाप लोकांचा बळी जाऊन अठरा वर्षे झाली. दरवर्षी समाजातील लोक गोवारी स्मारकाला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. राजकीय व सामाजिक संघटनेतील नेते व कार्यकर्ते राजकारण करून गोवारी समाजाला दिलासा देतात, मात्र असे किती दिवस जगायचे? असा सवाल करीत गोवारी समाजाच्या मागण्यांसाठी आता स्वस्थ न बसता समाजातील युवक आणि स्त्रीशक्तीने संघटित होऊन सरकारवर दबाव आणण्याचा निर्धार करून हजारो गोवारी बांधवांनी गोवारी स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनावर काढण्यात आलेल्या समाजाच्या मोर्चाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांना जीव गमवाव लागला. गोवारी बांधवांच्या स्मतिदिनानिमित्त हजारो गोवारी बांधवानी आज टी पॉईंटजवळील गोवारी स्मारकाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. ज्यांचे नातेवाईक या घटनेत मृत झाले त्यांना डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाही. प्रत्येकजण आपली व्यथा सांगत होता. घटनेला अठरा वर्षांचा काळ लोटला तरी अजूनही अनेक गोवारी बांधवाना न्याय मिळाला नाही. ज्यांचे नातेवाईक या घटनेचे बळी ठरले आहे आणि ज्यांनी प्रत्यक्ष ही घटना  बघितली आहे त्यातील काही लोकांशी संवाद साधला असता त्यांच्या भावना दाटून येत होत्या. इतकी वर्षे होऊन न्याय मिळाला नसल्यामुळे बहुतेकांच्या चेहऱ्यावर दुखाचे सावट दिसून आले. सकाळी १० वाजतापासून विदर्भातील विविध भागातून गोवारी समाजातील लोकांचे जथ्थे गोवारी स्मारकाजवळ येऊन शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहत होते. कोणाचे आई-वडील, कोणाचा भाऊ, तर कुणाचा मुलगा त्यावेळी झालेल्या चेंगचेगरीत मरण पावले होते, अनेकजण आठवणींना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.
आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गोवारी स्मारकाला पुष्पचक्र पाहून श्रद्धांजली अर्पण केली. महापौर अनिल सोले, उपमहापौर, संदीप जाधव, उप निवासी जिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, आमदार सुधाकर देशमुख, आमदार दीनानाथ पडोळे, बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विलास गरूड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे, गोवारी समाजाचे नेते सुधाकर गजबे आदी नेत्यांनी गोवारी स्मारकाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
गोवारी शहिदांमुळे समाजाला स्फूर्ती मिळाली होती. समाजातील लोक मारले गेले आता तरी सरकारला जाग येऊन मागण्या मान्य करतील, या आशेने घटनेच्या दुसऱ्या वर्षी वाट पहात बसले होते, पण २३ नोव्हेंबर २०१२ चा दिवस उजडला आणि शहिदांना श्रद्धांजली वाहून परतावे लागत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी समाजातील लोकांची संख्या कमी होती. गोवारी स्मारकाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्यामुळे व्हरायटी चौकाकडून महाराजबागकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक खोळंबली
होती.
 अर्धा तास अडकावे लागल्यामुळे अनेकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. जेथे गोवारी बांधवांचा मृत्यू झाला, त्या पटवर्धन शाळेसमोरील जागेवर ११४ कलश ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी अनेकांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
गोवारी स्मारकाकडे येणारे सर्व मार्ग गोवारी बांधवांनी सकाळपासूनच बंद केले होते. यावेळी टी पॉईंट चौकात विविध संघटनेतर्फे भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.    
..आणि स्मारकातील ज्योत पेटलीच नाही!
गोवारी स्मृतिदिनानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनातर्फे स्मारक परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी, रोषणाई केली जात होती, यावर्षी मात्र प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गोवारी समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गोवारी स्मारकासमोर ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मारकाची अतिशय दुर्दशा झाली असून त्यात आज ज्योत पेटविण्यात आली नाही. या संदर्भात सुधाकर गजबे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्रशासनाने स्मारकाकडे दुर्लक्ष केले आहे. ज्योत पेटविण्याचे काम प्रशासनाचे आहे. गोवारी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, आता स्थानिक प्रशासनही दुर्लक्ष करू लागले आहे, अशी खंत गजबे यांनी व्यक्त केली.  
गटातटाचे राजकारण
गेल्या काही दिवसात गोवारी समाजामधील गटातटाच्या राजकारणामुळे सामान्य गोवारी भरडला जात असून त्याला न्याय मिळत नाही. संघटनेचे नेते सुधाकर गजबे यांना काही गोवारी संघटनांकडून विरोध होऊ लागला त्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या असून प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाच्या नावावर राजकारण करीत असल्यामुळे समाजाच्या मुख्य मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.