‘निकोरेट क्विटलाइन’ दूरध्वनी सेवा आता पुण्यातही उपलब्ध
गुटखा आणि इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखू खाणाऱ्यांची तंबाखू सोडवणे आता सोपे होणार आहे.
तंबाखू सोडण्यासाठी मदत करणारी ‘राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन’ अर्थात ‘क्विटलाइन’ आता पुण्यातही उपलब्ध झाली आहे. इतकेच नव्हे तर या हेल्पलाइनद्वारे हे व्यसन सोडू इच्छिणाऱ्यांना स्थानिक तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रांतील डॉक्टरांचे साहाय्यही मिळू शकणार आहे. रुग्णांना १८००-२२७७८७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून या हेल्पलाइनचा लाभ घेता येणार आहे. या हेल्पलाइनद्वारे रुग्णांना इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये समुपदेशन मिळू शकते.    
‘निकोरेट’ या तंबाखू सोडण्यासाठीची उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या उपक्रमात तंबाखू सोडण्यासाठी व्यक्तीशी दूरध्वनी, एसएमएस, ई-मेल, शैक्षणिक साहित्य असे विविध मार्ग एकत्रितपणे वापरून संपर्क साधला जातो आणि तिला व्यसन सोडण्यासाठीचा आराखडा तयार करून दिला जातो. गरज असल्यास रुग्णाला स्थानिक तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रात पाठविले जाते. देशात अशी ५६० तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रे चालविली जातात.
ज्या व्यक्ती तंबाखू सोडताना दिसणाऱ्या तीव्र लक्षणांमुळे (व्रिडॉवल सिम्प्टम्स) त्रस्त असतील त्यांनाही या उपक्रमाचा भाग घेता येणार आहे.