दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेल्या या जिल्ह्य़ातील देऊळगावराजा तालुक्यातील ग्रामीण भागात सागवान, आंबा या मौल्यवान वृक्षांसह आडजात वृक्षांच्या अवैध कत्तलीला उधाण आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील हजारो वृक्षांची कटाई झाली असून त्याकडे वन व महसूल विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत.
जिल्ह्य़ातील वनांचे व वृक्षांचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत आहे. त्यामुळे जैवविविधतेवर संकट आले असून जिल्ह्य़ाचे पर्जन्यमान ६० टक्क्यांनी घटले आहे. नैसर्गिक संतुलन कायम राहण्यासाठी अवैध वृक्षतोडीला आळा घालणे गरजेचे आहे. देऊळगावराजा शहरासह ग्रामीण परिसरात वन व वृक्षराजीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे, परंतु हे वनवैभव टिकवून ठेवण्यास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी संपूर्णपणे अपयशी ठरत आहेत. या परिसरात सागवानासह बाभूळ, लिंब, चिंच, आंबा, पळस, शिसम, जांभूळ, हिवर यासारखे अनेक वृक्ष आहेत. परिसरात मोठे वनक्षेत्र असल्यामुळे बिबटे, अस्वल, तडस, लांडगे यासारख्या हिंस्त्र पशूंसह निलगाय, मोर, लांडोर, माकड, रानडुकरे यासह अनेक जंगली जनावरे वास्तव्य करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून खल्याळगव्हाण, सिनगाव जहांगीर, मेहुणाराजा, तुळजापूर, भिवगाव, सावखेड भोई, देऊळगावमही, डिग्रस, अंढेरा, टाकरखेड वायाळ, मंडपगाव, बायगाव, गारखेड, सुलतानपूर, चिंचखेड यासाह इतर भागात मोठय़ा प्रमाणावर अवैध वृक्षकटाई सुरू आहे. त्यामुळे लाखमोलाचे वनवैभव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस जंगल विरळ होत असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या वसतीस्थानावर गदा आली असून ते नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी व नागरिक दोघांचेही जीवन धोक्यात आले आहे.
दिवसाकाठी शेकडो सागवान व आडजात वृक्षांची कटाई करून त्यांची ट्रॅक्टर, मॅटेडोर व ट्रकने नियमबाह्य़ वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, आडजात वृक्षांच्या नावाखाली अपरिपक्क सागवान झाडांची कत्तल करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या मोठय़ा प्रमाणावर अवैध वृक्ष कटाई होत असतांना वनकर्मचारी कुठलीच कारवाई करीत नाही. या अवैध वृक्षतोडीला वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा छुपा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.
खाजगी वृक्षतोड अधिनियमातंर्गत मोठय़ा प्रमाणावर लाचखोरी करून सागवान वृक्षतोडीला परवानगी देण्यात येत आहे. अशा हजारो वृक्षांची आतापर्यंत कत्तल झाली आहे. या कत्तलीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात अवैध कमाई केली आहे. यासंदर्भात सहाय्यक वनसंरक्षक (संरक्षण) अजय जावरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नियमानुसार होणाऱ्या खाजगी वृक्षतोडीला परवानगी आहे, मात्र अवैध वृक्षतोडीची या कार्यालयाकडे तक्रार केल्यास अशी वृक्षतोड करणाऱ्यांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात नागरिक वरिष्ठ वनअधिकाऱ्याशी संपर्क करू न त्यांना माहिती देऊ शकतात, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest of deulgaonraja area in danger
First published on: 30-03-2013 at 05:03 IST