बांधकाम व्यावसायिकावर गोळी झाडल्याचा आरोप
एका बांधकाम व्यावसायिकाला रक्तचंदनाचा तस्कर बनवून त्याच्यावर २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गोळीबार करणारे सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा अल्लुरकर यांना आज, २८ एप्रिलला चौकशीसाठी नागपुरात आणण्यात आले. आचारसंहितेमुळे सक्करदरा पोलिस ठाण्यात त्यांनी जमा केलेल्या पिस्तुलातून खरोखरच गोळी झाडली गेली का, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकारी प्रफुल्ल भंगारडे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राजेश पोखरकर यांना पनवेल वनविभागातील अधिकारी कृष्णा अल्लुरकर व अनिल परब यांनी रक्तचंदनाचा तस्कर ठरवून त्यांच्याकडे २ कोटी रुपयाची खंडणी मागितली होती. ही रक्कम देण्यास पोखरकर यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यावर गोळीबारसुद्धा केला होता. त्यानंतरही धमकी देऊन ५० लाख रुपये उकळले होते. या प्रकारानंतर वनखात्याने त्यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे, तर पनवेल वनखात्यातील सुमारे १६ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या प्रकरणात निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले. त्यापैकी काहींना अलिबाग सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला, तर अल्लुरकर व परब यांच्यासह चौघांना जामीन नाकारला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, उच्च न्यायालयाने फक्त दोनच अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करून अल्लुरकर व परब यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तब्बल २४ दिवसांच्या फरार प्रकरणानंतर अल्लुरकर यांनी २६ एप्रिलला शरणागती पत्करली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २ मे पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या पिस्तुलातून गोळीबार झाला
ते पिस्तुल व रायफल आचारसंहितेमुळे सक्करदरा
पोलिस ठाण्यात जमा केल्याचे अल्लुरकर यांनी
सांगितले. त्यांच्या बयाणावरून आज, २८ एप्रिलला पनवेलचे अधिकारी त्यांना चौकशीसाठी नागपुरात
घेऊन आले. या पिस्तुलातून खरोखरच गोळी झाडली गेली का, याची चौकशी आता तज्ज्ञांकडून केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीपासूनच वादग्रस्त
कृष्णा अल्लुरकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे. रामटेक येथे वनपरिक्षेत्रअधिकारी असताना मँगनीज घोटाळ्यात त्यांचे नाव गुंतले होते. नाशिक, नागपूर आदी अनेक शहरात त्यांची निवासस्थाने असल्याचे कळते. नागपूर येथे त्यांचे सुसज्जित जीमदेखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे या एकूणच प्रकरणाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest officer in nagpur for investigation
First published on: 30-04-2014 at 08:54 IST