खासगी सुरक्षा रक्षकांच्या मुदतवाढीची नामुष्की

महापालिकेवर साडेचार लाखांचा बोजा ठाणे महापालिकेने मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अजूनही सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या कार्यरत

महापालिकेवर साडेचार लाखांचा बोजा
ठाणे महापालिकेने मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अजूनही सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या कार्यरत असलेल्या भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना वाढीव पगारासह आणखी सहा महिन्यांची मुदत देण्याची नामुष्की महापालिकेवर पुन्हा ओढवली आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्तावही महापालिका प्रशासनाने तयार केला असून येत्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, सुमारे चार लाख ५० हजार रुपये खासगी सुरक्षारक्षकांच्या वाढीव पगाराचा बोजा महापालिकेला सोसावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेकडे स्वत:ची तसेच हक्काची सुरक्षाव्यवस्था उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळाचे खासगी सुरक्षारक्षक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येतात. त्यांच्यामार्फत महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्या, दवाखाने, जलकुंभ यांच्यासह सर्वच मालमत्तांचे रक्षण करण्यात येते. सध्या महापालिकेत भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळाचे दहा सुरक्षा पर्यवेक्षक आणि ३७५ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. मध्यंतरी, खासगी सुरक्षारक्षकांऐवजी महापालिका प्रशासनाने स्वत:ची सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना लोकप्रतिनीधींनी केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रियाही सुरू केली. पण त्यास उशीर झाल्याने महापालिकेला खासगी सुरक्षारक्षकांना यापूर्वी दोनदा मुदतवाढ द्यावी लागली होती. दरम्यान, भरती प्रक्रियेच्या पहिल्या तीन दिवसांत उमेदवारांची संख्या वाढली. त्यामुळे ही प्रक्रिया बंद करून त्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार ३८५ जागांसाठी सुमारे ८० हजार आले आहेत. त्यामध्ये अर्जाची छाननी, पात्र उमेदवारांना एसएमएस पाठविणे आणि मैदानी चाचणी, यासारख्या प्रक्रियेसाठी अजूनही सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. असे असताना सध्या महापालिकेत कार्यरत असलेल्या खासगी सुरक्षारक्षकांची मुदत ऑक्टोबर महिन्यातच संपली आहे. त्यामुळेच या सुरक्षारक्षकांना वाढीव पगारासह आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Four lakhs expenditure increase of corporation over private security gurds