शहरी भागात अन्नधान्य महाग झाल्याची ओरड करणारे भाजप नेते शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले, असा कांगवा करत आहेत. अशाप्रकारचे दुटप्पी वक्तव्य करून भाजप नेते शहरी व ग्रामीण जनतेसोबतच गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह व माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ब्रम्हपुरी येथील शेतकरी मेळाव्यात काँंग्रेस आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप केला होता, मात्र दिल्लीत याच दोन नेत्यांनी अन्नधान्य व भाजीपाल्यांचे भाव वाढल्याची टीका केली होती.
शहरी भागात सभा घेतांना काँंग्रेस आघाडी सरकारने महागाई वाढविल्याची ओरड करायची आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, अशी ओरड करायची. या दुटप्पी धोरणामुळे भाजप नेते शहरी व ग्रामीण लोकांची फसवणूक करत आहेत, असे सांगत पुगलिया यांनी राजनाथ सिंह व गडकरी यांच्या बेताल वक्तव्याचा  समाचार घेतला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी ७२००० कोटीची कर्जमाफी केली, याचा विसर या दोन्ही नेत्यांना पडला आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाला केंद्राकडून संपूर्ण मदत मिळत आहे. याउलट, या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. असे काम करणारे या पक्षाचे कंत्राटदार, खासदार आमदार एक शब्दही बोलायला तयार नाहीत. अशा भ्रष्ट कंत्राटदारांमुळेच गोसीखुर्दचा ६९० कोटीचा हफ्ता रोखण्यात आला. गडकरी व राजनाथसिंह यांनी निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांची पाठराखण केली. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही पुगलिया यांनी सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग व सिंचन मंत्री हरीश रावत यांच्याकडे केली आहे.
जनहित याचिकेचा निकाल लागेपर्यंत केंद्राने कोणताही पैसा गोसीखुर्द व इतर प्रकल्पांना देऊ नये, कालव्याच्या निकृष्ट कामाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे काम केंद्राने स्वत: करावे अन्यथा त्या कामांचा दर्जा असाच निकृष्ट राहील. विभागीय सिंचन मंडळ भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून या प्रकल्पाची किंमत वाढवून केंद्र व राज्याला लुटण्याचा या कंत्राटदारांचा प्रयत्न आहे.
सिंचन विभागातील भ्रष्टाचाराबाबत या आजी-माजी नेत्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, भाजपच्या या दुटप्पीपणाचा जिल्हा कांॅंग्रेसने जाहीर निषेध केला आहे.