शहरातील २९ स्मशानभूमींमध्ये मोफत अंत्यविधी साहित्यासाठी १ कोटी ६२ लाखांची तरतूद महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितले. शहरात हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या खूप आहे. एखाद्याच्या घरात दु:खद प्रसंग घडला तर त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगात मदत व्हावी, यासाठी मोफत अंत्यविधी करण्याची योजना २३ जानेवारीपासून करण्याचे ठरविण्यात आले आहे.
शहरातील २९ स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीच्या वेळी केरोसिन मिळण्यास अडचणी निर्माण होतात. रात्री-अपरात्री तर डिझेल किंवा अन्य पर्याय उभे करावे लागतात. या कामासाठी केरोसिनचा विशेष कोटा मंजूर करण्याची विनंती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेकडून स्मशान परवाना घेतानाच ती पावतीही आता दिली जाणार आहे. एका अंत्यविधीसाठी साधारणत: तीन हजार रुपये खर्च अपेक्षित धरून ही योजना आखण्यात आल्याचे उपमहापौर जोशी यांनी सांगितले.
शहरात सन १९९६ पासून विद्युतदाहिनी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्याचे विद्युतदेयक अधिक असल्याने या सुविधेसाठी १०० रुपये आकारले जात. ही योजना सुरू झाल्यानंतर ते शुल्कही रद्द करण्यात येणार आहे. ज्यांना या मोफत योजनेचा लाभ घ्यायचा नसेल, त्यांनी या कामासाठी उघडल्या जाणाऱ्या स्वतंत्र खात्यात पैसे भरावेत, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. या योजनेसाठी लागणारी तरतूद करण्यासाठी लेखाशीर्ष बदलावे लागणार आहे. त्याच्या मान्यतेसाठी या योजनेचा आराखडा सर्वसाधारण सभेतही ठेवला जाणार आहे.
कचऱ्यासाठी प्रत्येकी ६० रुपये
कचरा उचलण्यासाठी नेमलेले ठेकेदार नीट काम करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रत्येक घरातून ६० रुपये घेऊन नवी योजना सुरू करता येईल का, याचा अभ्यास सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. अशा प्रकारची योजना सुरू करताना बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी बचतगटांची मदतही घेण्याचा महापालिकेचा विचार असल्याचे उपमहापौर जोशी यांनी सांगितले. बाजारपेठेतून प्लास्टिकच्या पिशव्या व पुठ्ठे वेचणाऱ्याने दुकानासमोरची जागा साफ करून दिली तर हे काम करणाऱ्याला पाच रुपये दिले तर बरेच काही होऊ शकेल,  असेही त्यांनी सांगितले.