सर्वशिक्षा अभियानांतर्गत शहरातील लहाने हॉस्पिटल येथे २४ ते २७ मार्चदरम्यान परभणी येथील ३० विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. दुभंगलेले ओठ व टाळू या आजाराने ग्रस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया झाली.
परभणी जिल्हय़ातील ५५० विद्यार्थ्यांवर मागील आठ वर्षांत लहाने हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दरवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत अशा व्यंगाच्या रुग्णाची तपासणी करून त्यांना लहाने हॉस्पिटल येथे पाठवण्यात येते.  सर्वशिक्षा अभियानांतर्गत आजपर्यंत अमरावती, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीदर, भालकी, गुलबर्गा, सोलापूर, नांदेड, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना, धुळे नंदूरबार, यवतमाळ, सातारा, औरंगाबाद, हिंगोली, गोंदिया, निजामाबाद, सांगली, नागपूर या सर्व जिल्हय़ांतील एकूण ४३८५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्माईल ट्रेन व लहाने हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू आहे.
राज्यात अशा व्यंगावर सर्वाधिक मोफत शस्त्रक्रिया लहाने हॉस्पिटलमध्ये झाल्याची नोंद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.  या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. विठ्ठल लहाने, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शहा, डॉ. कल्पना लहाने, डॉ. किरण तोडकरी, डॉ. राजेश्वरी स्वामी, डॉ. दुष्यंत बुलबुले, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. संदीपान साबदे, डॉ. राम कुलकर्णी, लहाने हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.