पंचायत समितीतील अभियंत्यांच्या बदल्या वादग्रस्त ठरल्या असून, राष्ट्रवादीमध्येच त्यावरून धुसफुस सुरू झाली आहे. सत्ताधारी सदस्यांबरोबरच विरोधी सदस्यही बदल्यांवर नाराज असून जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्तक्षेपास विरोध करण्यात येत आहे.
पंचायत समितीतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी हस्तक्षेप केला. काही वादग्रस्त अभियंत्यांवर विशेष मेहेरनजर दाखविण्यात आली. मंगळवारी राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे यांच्याबरोबरही या विषयावरून उपसभापती  कैलास कणसे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी राजीनाम्याची धमकी दिली होती अशी चर्चा आहे, पण मुरकुटे यांनी माघार घेऊन हा विषय थांबविला. बदल्यांवरून सभापती सुनीता बनकर, सदस्य क्षीरसागर हेदेखील नाराज आहेत. मुरकुटे यांनी मात्र असे काही घडलेच नाही असा खुलासा केला आहे.
पंचायत समितीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची सत्ता आहे. समितीच्या कारभारात राजकीय मतभेद अद्याप झाले नव्हते. विरोधी काँग्रेस सदस्यांशीही पदाधिकाऱ्यांचे चांगले संबध आहेत. पण आता राष्ट्रवादीतच धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य नवले हे विविध कामात हस्तक्षेप करतात असा आक्षेप आहे. बेलापूर येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला. विरोधकांबरोबरच आता राष्ट्रवादीचे सदस्यही नाराज आहेत. तूर्तास या प्रकरणावर तातडीने पडदा टाकण्यात आला आहे. सिद्धार्थ मुरकुटे यांनी असे घडलेच नाही असा दावा केला असला तरी या प्रकरणावरून मतभेद झाले होते, हे लपून राहिले नाही.