नवीन नाटके रंगभूमीवर यावीत, नव्या दमाचे नाटककार, कलावंत, नेपथ्यकार मिळावेत या हेतूने मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई यांच्यावतीने दीर्घाक स्पर्धा २०१३ चे आयोजन करण्यात आले आहे. कमीतकमी ६० मिनिटे ते जास्तीत जास्त ८० मिनिटांच्या कालावधीचे दीर्घाक असावेत अशी स्पर्धेची प्रमुख अट आहे. प्राथमिक फेरी १४ डिसेंबर ते १२ जानेवारी २०१४ या कलावधीत प्रत्येक शनिवार, रविवारी घेण्यात येणार आहे.
कुठल्याही विषयावर पूर्णत: नवीन लिहिलेला दीर्घाक असावा, त्याचा कुठेही प्रयोग केलेला नसावा. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर अशा पाच शहरांत प्राथमिक फेरी होणार असून देशातील कुठल्याही कार्यरत संस्थेला सहभागी होता येईल. प्रवेशिका पाठविणाऱ्या संस्थेचा पूर्व इतिहास, नाटय़ कारकिर्द, तसेच त्यातील यश या आधारावर प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येक शहरामधून २० संस्थांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्राथमिक फेरीतून सर्वोत्तम तीन दीर्घाक अंतिम स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. पहिले पारितोषिक एक लाख रुपये, दुसरे व तिसरे पारितोषिक अनुक्रमे ७५ हजार व ५० हजार रुपये इतके दिले जाणार असून त्याशिवाय लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, विनोदी अभिनय यासाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा विभागांतील पारितोषिके प्रत्येक पाच हजार रुपयांची आहेत. प्रवेश अर्ज ‘निर्माता संघ’ दीर्घाक स्पर्धा, अद्वैत थिएटर्स, १२१, विद्या भुवन, जिप्सी हॉटेलच्या वर, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई -४०००२४ या पत्त्यावर प्रवेशशुल्कासह पाठवावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२४४४१४१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.