मराठी साहित्यातील ‘विल्यम शेक्सपिअर’ असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या राम गणेश गडकरी ऊर्फ ‘गोविंदाग्रज’ यांचे समग्र साहित्य आता माहितीच्या महाजालावर उपलब्ध झाले आहे. संगणक प्रकाशनाने तयार केलेल्या  ramganeshgadkari.com  संकेतस्थळावर गडकरी यांची सर्व नाटके, कविता, विनोदी लेखन वाचायला मिळते.
इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअरसह अन्य काही लेखकांचे  साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. मराठीत गेल्या काही वर्षांपासून हळूहळू का होईना पण साहित्यक/ कवी यांच्यावरील संकेतस्थळे तयार होऊ लागली आहेत. त्यावर त्यांचे साहित्य देण्यात आले आहे. काळानुरूप मराठी साहित्यातील काही लेखकांची पुस्तके त्यांचे पुनर्मुद्रण झालेले नसल्याने विद्यार्थी किंवा अभ्यासकांसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत, मात्र ही उणीव संगणक प्रकाशनाने भरून काढली असून गडकरी यांचे समग्र साहित्य आता इंटरनेटवर उपलब्ध झाले आहे.
गडकरी यांनी लिहिलेली नाटके ही काळाच्या कसोटीवर उतरली असून आज ८०-९० वर्षांनंतरही ती सामाजिक आशय आणि विचारासाठी महत्वाची ठरतात. या संकेतस्थळावर गडकरी यांची ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’ ‘भावबंधन’, ‘प्रेमसंन्यास’, ‘राजसंन्यास’ आणि ‘वेडय़ांचा बाजार’ ही सर्व नाटके येथे वाचायला मिळतात. अंक पहिला, दुसरा या क्रमाने ही नाटके येथे देण्यात आली आहेत.
गडकरी यांनी ‘गोविंदाग्रज’ या नावाने काव्यलेखन केले होते. गडकरी यांच्या समग्र कविताही येथे वाचायला मिळतात. ‘वाग्वैजयंती’ हा गडकरी यांचा एकमात्र काव्यसंग्रह. यात त्यांनी मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितांपर्यंत तसेच चार ओळींपासून दहा पाने भरतील अशा दीर्घकविताही लिहिल्या. त्या सर्व कविता येथे आहेत. गडकरी यांच्या जवळपास १३८ कविता येथे आहेत.गडकरी यांनी विनोदी लेखन ‘बाळकराम’ या टोपणनावाने केले होते. या लेखनातील ‘रिकामपणाची कामगिरी’सह अन्य विनोदी लेखनही येथे आहे. गडकरी यांच्या अन्य गद्य लेखनात ‘चिमुकली इसापनीती’, ‘नाटय़कलेची उत्पत्ती’, ‘मृत्यूनंतर गुरुची प्रस्तावना’ आदींचा समावेश आहे. ते लेखनही संकेतस्थळावर आहे.
छायाचित्र गॅलरी हा स्वतंत्र विभाग असून त्यात २५ छायचित्रे आहेत. या शिवाय राम गणेश गडकरी यांच्या साहित्याविषयी अभ्यास करणारे विद्यार्थी व अभ्यासक यांना उपयोगी पडेल अशी एक सविस्तर सूचीही येथे आहे. गडकरी यांच्यावर वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले लेखही संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. संकेतस्थळावरील हे सर्व साहित्य मोफत उपलब्ध असणार आहे.