लोकांच्या हितासाठी, त्यांच्यात एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आज वेगळेच स्वरूप धारण केले आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली शहरातील अनेक प्रमुख मार्गासह छोटय़ा-मोठय़ा कॉलन्यांमध्ये उभारण्यात येत असलेल्या मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून काही ठिकाणी तर रस्ता पूर्णपणे बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी लक्षात घेत अशा ठिकाणांचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
सार्वजनिक मंडळांना मंडप उभारताना वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची अट महापालिकेकडून टाकली जाते. परंतु, नोंदणीची पूर्तता झाल्यावर हे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. रस्ता अडविणारे मंडप उभारले गेले तरी पारंपरिक ठिकाण म्हणून पालिकेकडून सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, या पद्धतीने थेट रस्त्यात अवाढव्य आकाराचे मंडप उभारणारी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पालिकेची अनास्था यांच्या कचाटय़ात नागरिक सापडल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे पालटले असून त्यातून सर्वसामान्यांना ‘आनंद कमी अन् त्रास अधिक’ अनुभवयास मिळत आहे. सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर उभारलेले मंडप हे त्याचे उदाहरण. मातब्बर राजकारणी, नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या उत्सवाच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. त्याकरिता भव्यदिव्य आकाराची सजावट करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. त्याचा परिपाक मंडपांचा आकार विस्तारण्यात झाला आहे. मध्यवर्ती भागातील रस्ते आकाराने लहान असल्याने काही मंडळांनी उभारलेल्या मंडपांनी रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. घनकर गल्ली व आसपासच्या परिसरात वाहनधारकांना जाण्यासाठीही रस्ता शिल्लक नाही. अशोकस्तंभ, मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळा, काठेगल्ली, पंचवटीतील आडगाव नाका अशा बहुतेक भागात स्थानिक मंडळांनी उभारलेल्या मंडपांमुळे एकतर रस्ता पूर्णपणे किंवा अंशत: वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मंडपाची उभारणी करताना संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्याचा वाहनधारक व स्थानिकांना त्रास होऊ शकतो याचा विचार केल्याचे दिसत नाही. नवीन आडगाव नाक्यावरील एका मंडपामुळे तर महामार्गालगतचा सव्र्हिस रोडच बंद झाला आहे. मागील महिन्यात खा. समीर भुजबळ यांनी सव्र्हिस रोडने जाणाऱ्या वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेत या रस्त्यावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले होते.
रस्ते व्यापत वाहतुकीला अडसर निर्माण होईल अशा तऱ्हेने मंडप उभारणारी बहुतेक मंडळे ही बडय़ा राजकीय मंडळींची असल्याने त्यांच्याकडे त्याविषयी विचारणा करण्याचे धाडस सर्वसामान्यांकडून होत नाही. उलट अशा राजकीय मंडळींनीच जबाबदारी ओळखून आपल्या परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्याकडून तसा विधायक दृष्टिकोन पुढे येत नसल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांनाच आपला मार्ग बदलावा लागत आहे. काही मंडळांनी १० ते १५ दिवस आधीपासून हे मंडप उभारून आपली सजावट सुरू केली आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांची नोंदणी महापालिका करते. ही नोंदणी करताना महापालिकेने नियमावली आखून दिली आहे. परंतु पालिकेची ही नियमावली केवळ कागदोपत्री राहिल्याचे दिसून येते. नोंदणी शुल्कापोटी प्रत्येक मंडळाकडून २८१ रूपये शुल्क घेणारी पालिका संबंधित मंडळांनी अटी व शर्तीचे पालन केले की नाही, याची साधी तपासणीही करत नाही. जवळपास संपूर्ण रस्ता व्यापणारी उभे राहिलेले मंडप ही त्याची साक्ष आहे. महापालिकेच्या अटी-शर्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. मंडप उभारताना कॉक्रिट वा डांबरी रस्त्यावर खड्डे करू नये असे म्हटले आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या या मंडपांनी या नियमाचे पालन केले काय, याची साधी चौकशी झाल्याचे दिसत नाही.
* मंडप उभारण्यापूर्वी पोलीस ठाण्याची लेखी परवानगी आवश्यक
* पक्क्या स्वरूपाच्या बांधकामास प्रतिबंध. रस्त्यांवर खड्डे करू नये
* ध्वनिप्रदुषणामुळे स्थानिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे
* कोणत्याही प्रकारे रहदारीस अडथळा होणार नाही याची काळजी घेणे
* जागेचे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागेल
* निर्माल्य व कचऱ्यासाठी स्वतंत्र टाकी ठेवावी
* महापालिकेच्या खांबावरून विद्युत पुरवठा घेऊ नये
ही विभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी असे मंडप उभारले गेले असतील तरी ती त्या त्या मंडळांची गणेशोत्सव साजरा करण्याची पारंपरिक जागा आहे. धोरण ठरविणे आमचे काम आहे. नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांवर आहे.
आर. एम. बहिरम.
उपायुक्त, मूल्य निर्धारण कर संकलन विभाग
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नाशिक शहरातील विविध ठिकाणी थेट रस्त्यावरच ठाण मांडलेले, वाहतुकीस अडथळा ठरणारे मंडप उभारणीचे सुरू असलेले काम-
१) पंचवटीतील आडगाव नाका. २) जुनी तांबट गल्ली, ३) काठे गल्लीतील रवींद्र विद्यालयाजवळील चौफुली, ४) मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळा चौक,
५) अशोक स्तंभावरील गणेश बँकेसमोर,
६) घनकर लेन
(छाया – मयूर बारगजे)