केंद्र सरकारच्या नवीन गॅस धोरणानंतर गॅस वितरक ग्राहकांची पिळवणूक व वितरणात भ्रष्टाचार करत असल्याने अनुदानित व खुल्या बाजारातील गॅस सिलेंडरचे दर प्रशासनाने जाहीर करावेत, तसेच गॅस वितरकांनी त्याचे फलक लावावेत, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगर शहरातील गॅस वितरक नवे गॅस कनेक्शन देत नाहीत, वरुनच ते बंद असल्याची खोटी माहिती देत आहेत, नव्या कनेक्शनचा दर १ हजार ४५० रुपये असताना ४ हजार रु. घेतले जातात, ज्या कुटुंबाकडे दोन कनेक्शन आहेत त्यातील एक परत करताना वितरक ६०० रुपये देतात, मात्र नव्या कनेक्शनसाठी १ हजार ४५० रु. दर का आकारला जातो, वारस हक्काप्रमाणे रेशन कार्डवर कनेक्शन ट्रांन्सफर करावे, धर्मदाय संस्थांना सबसीडीच्या दराने सिलेंडर मिळावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सेवादलाचे हरजितसिंग वधवा, अजय दिघे, धोंडिराम कांबळे, विपूल शहा, प्रमोद गांधी, बाळासाहेब राठोड, बाबासाहेब सूडके आदींनी हे निवेदन दिले.