सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्याचे कामकाज धुळे न्यायालयात ३ जानेवारीपासून सुरू होणार असून या घोटाळ्याशी संबंधित जळगाव कारागृहात असलेल्या संशयितांना धुळे येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घरकुल घोटाळ्याशी संबंधित संशयित आ. गुलाब देवकर यांचा जामीन नामंजूर करताना सदरचा खटला जळगावऐवजी शेजारील धुळे येथे विशेष न्यायालयात चार आठवडय़ांच्या आत चालविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जळगाव शहर पोलिसांना शरण आलेले देवकर यांची रवानगी धुळे कारागृहात ३१ डिसेंबर रोजी करण्यात आली.
३ जानेवारीपासून धुळे येथील विशेष न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू होणार असल्याने खटल्याशी संबंधित संपूर्ण दस्तऐवज धुळ्याला नेण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच जळगाव कारागृहात असणारे आ. सुरेश जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे जगन्नाथ वाणी आणि राजा मयूर या संशयितांनाही धुळे कारागृहात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १९९७ मध्ये जळगाव नगरपालिकेत सुमारे १६९ कोटी रुपयांचा घरकुल घोटाळा उघडकीस आला. त्या प्रकरणी तब्बल नऊ वर्षांनी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस ठाण्यात जानेवारी २००६ मध्ये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यावर अनेक तपास अधिकारी बदलले. त्यामुळे जाणीवपूर्वक तपासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच अप्पर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन सर्वप्रथम रायसोनी, वाणी आणि मयूर यांना २८ जानेवारी २०१२ रोजी अटक केली. १० मार्च २०१२ रोजी आ. सुरेश जैन यांना अटक करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. घरकुल प्रकरणात एकूण ५७ संशयित असून आ. जैन यांच्यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेले देवकर हे दुसरे माजी मंत्री व आमदार आहेत. या सर्वाविरोधात फौजदारी स्वरूपाचा कट करणे, संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार करणे, शासकीय पैशांचा अपहार व विश्वासघात यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.