जून-जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सांगली जिल्हय़ातील वाळवा, पलूस तालुक्यांतील सुमारे१०० किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते दुरुस्त करून त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी या दोन तालुक्यांतील शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी अधीक्षक अभियंत्यांना घेराव घातला.    
वाळवा तालुक्यामध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी कारखान्यासह औद्योगिक व शैक्षणिक संकुल आहे. त्यामध्ये हुतात्मा सहकारी बँक, दूध संघ व इतर शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. वाळवा गावाशी जोडले जाणारे सर्व रस्ते शासनाच्या दुर्लक्षामुळे अंत्यत खराब झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे रस्ते पावसामुळे जागोजागी उखडले आहेत. अशा ओबडधोबड रस्त्यांमुळे दुधाचे टँकर, उसाची वाहने, साखर मोलॅसिस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, प्रवाशी बसेस, विद्यार्थी, शेतकरी यांना सामावणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. रस्ते खराब असल्यामुळे वैद्यकीय उपचारास विलंब होऊन रुग्णांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.    
या समस्यांचे फलक घेऊन वाळवा व पलूस तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व नागरिक आज मोर्चात उतरले होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या मोठी असल्याने मोर्चाच्या मार्गावरील वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत होता. हुतात्मा समूहाचे नेते वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या कार्यालयावर आल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन रस्तादुरुस्तीचे काम लवकर न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.