जिल्ह्य़ात शुक्रवारी ‘मुलगी वाचवा’ अभियानांतर्गत मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी आरोग्य विभागाने रॅलीचे आयोजन केले आणि शनिवारी तालुक्यातील पारोळा गावच्या शिवारात झुडपात टाकून दिलेली पाच महिन्यांची जिवंत मुलगी सापडली. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले.हिंगोली-वाशीम रस्त्यावर पारोळा गावाच्या शिवारात नामदेवराव दहातोंडे यांच्या शेतातील झुडपांमध्ये त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता लहान जिवंत मुलगी आढळून आली. दहातोंडे यांनी तत्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या बाबत माहिती दिली. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.