पोलीस हा जनतेचा सेवक आहे याची जाणीव करून देताना पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वसामान्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन नवीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी शनिवारी आयुक्तालयातील उच्च अधिकाऱ्यांना केले. तक्रार करण्यास आलेल्या ‘कॉमन मॅन’ला पोलिसांशिवाय दुसरा कोणता आधार नसल्याने त्याला न्याय देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी घरगुती कारण देऊन या महिन्याच्या सुरुवातीला नवी मुंबईला रामराम ठोकला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले, पण राजीनाम्यावर कायम राहिलेल्या प्रसाद यांनी अखेर पोलीस दलाला रामराम ठोकला. त्यामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी दोन आठवडय़ांनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात रंजन यांनी पदभार स्वीकारला असून उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आपली कार्यदिशा स्पष्ट केली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्याचा विश्वास आणि आधार वाटला पहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी काही उच्च अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीविषयी माहिती सादर केली. नवीन पोलीस आयुक्तांसमोर शहरातील वाढत्या घरफोडय़ा, चोऱ्या आणि चेनस्नॅचिंग यांच्यावर नियंत्रण आणण्याची मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. कधीकाळी खून, मारामाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले नवी मुंबई, उरण, पनवेल या शहरांत अलीकडे या गुन्हेगारीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण आले आहे. पण भाईगिरी बंद झाल्यानंतर लेडीज बार, ड्रग्स यांचे प्रमाण या शहरात वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयुक्तांनी ठोस उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. गुन्हेगारीवर काबू मिळविताना या आयुक्तालयाचा कार्यविस्तार खोपोलीपर्यंत करण्याचे कामही प्रभात रंजन यांना पार पाडावे लागणार आहे.

छमछम सुरूच

लेडीज बारचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत नवीन आयुक्तांनी पदभार घेतला त्याच दिवशी वाशी येथील संडे बारवर पोलिसांनी रात्री उशिरा छापा घातला. या बारमध्ये आठ महिलांना परवानगी असताना सहा अधिक महिला आढळून आल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील काही लेडीज बारमधील छमछम रात्री उशिरापर्यंत सुरू असते. कोपरखैरणे येथील एका बारमध्ये तर पैशांचा पाऊस पडतो. बारमध्ये पैशांची दौलतजादा करण्यास मज्जाव आहे. तरीही एपीएमसीतील काही व्यापारी ही हौस बंद खोलीत पूर्ण करीत असतात. त्या ठिकाणी नृत्यदेखील केले जात असल्याचे समजते. यात २१ वर्षांखालचे तरुणही मद्याचे घोट रिचवताना दिसून येतात. नवीन आयुक्तांना ही कुप्रसिद्ध ओळखही पुसण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.