गोदातीराला नवचैतन्य देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आणि जवळपास दहा वर्षांपासून केवळ स्वप्नातीत राहिलेला ‘गोदा पार्क’ विकसित झाल्यावर कसा दिसणार, याची तृष्णा शनिवारी सायंकाळी रिलायन्स फाऊंडेशनतर्फे केल्या जाणाऱ्या सादरीकरणामुळे शमणार आहे. विशेष म्हणजे हे सादरीकरण खुद्द राज यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांचीही उपस्थिती राहणार आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. गोदा पार्क विषयी राज यांची नेमकी असणारी संकल्पना या निमित्ताने नव्याने उलगडून दाखविली जाणार आहे. याप्रसंगी वसंत गिते, नितीन भोसले, उत्तम ढिकले या आमदारांसह समीर भुजबळ, हरिश्चंद्र चव्हाण, प्रतापदादा सोनवणे या खासदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. महापौर अॅड. यतिन वाघ, विरोधी पक्षनेते सुनील बडगुजर, पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त संजय खंदारे आदी उपस्थित राहणार आहेत.
राज ठाकरे हे शिवसेनेत असताना आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना गोदा पार्कची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने या प्रकल्पाचे काहीअंशी काम केले. परंतु तो अनेक अडचणींमुळे पुढे सरकला नाही.महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकल्यानंतर हा प्रकल्प आता कुठे ‘मोकळा श्वास’ घेण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. रिलायन्स फाऊंडेशनने जामनगरच्या धर्तीवर गोदा पार्क साकारण्याची तयारी केली आहे. एक किलोमीटर क्षेत्राच्या विकासाला साधारणत: सात ते आठ कोटी रूपयांचा खर्च येईल. त्याचा सर्व भार फाऊंडेशन उचलणार असला तरी शहरवासीय व पर्यटकांसाठी तो विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. या प्रकल्पात ज्या ज्या नाविण्यपूर्ण संकल्पना मांडल्या गेल्या आहेत, त्याची उकल गोदापार्क संकल्पनेच्या सादरीकरणातून होईल.
गोदा पार्क या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी गंगापूर गाव ते शहरातील मध्यवर्ती अशा होळकर पुलापर्यंतचा भाग निवडण्यात आला आहे. गोदावरीच्या दोन्ही तीरांच्या बाजूने साकारला जाणारा हा प्रकल्प एकूण १३.५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील काही क्षेत्र पालिकेने विकसित केले आहे. त्यात उजव्या तीरावर घारपुरे घाट ते सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेपर्यंतचा भाग आणि डाव्या तिरावरील रामवाडी पूल ते होळकर पुलादरम्यानचा परिसर यांचा समावेश आहे.
रोपवाटिका ते आसाराम बापू पुलादरम्यानच्या डाव्या तीरावरील सुमारे एक हजार मीटर लांबीची जागा पालिकेच्या ताब्यात असून या ठिकाणी अल्पावधीत काम करता येईल. आनंदवल्ली-नवश्या गणपती- गंगापूर गावपर्यंत उजव्या तीरावर बहुतांश जागा मालक या प्रकल्पासाठी स्वच्छेने देण्यास तयार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रश्न आहे तो सामाजिक वनीकरण विभाग संचलित रोपवाटिकेच्या जागेचा. गोदा पार्ककरिता या जागेतून पादचारी मार्गासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. या मार्गावर केवळ पायी भ्रमंती होणार असल्याने झाडांची तोड वा नुकसान होणार नाही ही बाब संबंधित विभागाला पटवून दिली जात आहे.
गोदा पार्कने काय साध्य होणार ?
गोदावरी नदी व परिसर स्वच्छ राखण्यास मदत
वृक्ष लागवड व संवर्धनाद्वारे पर्यावरणाचा समतोल
गोदावरी नदी किनाऱ्यांचे संरक्षण
नदीकाठावर नव्याने झोपडपट्टी तयार होण्यास प्रतिबंध
लेझर शो, पादचारी पूल आणि असे बरेच काही
गोदावरी नदीकाठावरील आल्हाददायक वातावरणात भविष्यात गोदापार्कवर भ्रमंतीसाठी आलेल्या प्रत्येक जण हरखून रममाण होऊन जाईल या पद्धतीने गोदा पार्कचे नियोजन केले जात आहे. ‘जॉगिंग ट्रॅक’वर भ्रमंतीसाठी येणाऱ्यांकरिता विशाल वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे. नदीच्या एका तीरावरून दुसरा तीर गाठण्यासाठी काही ठिकाणी पादचारी पूल उभारले जातील. जेणेकरून नदीच्या पाण्यावरून थेट पायी फेरफटका मारण्याचा आनंद मिळेल. हवाई मार्गे जाण्यासाठी ‘रोप वे’चाही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आहे. नदीकाठावरील निसर्गसौंदर्यात भर टाकण्यासाठी ठिकठिकाणी दुर्मीळ अशा फुलांचा बगीचा आणि हिरवळ तयार केली जाईल. जॉगिंग ट्रॅकवरील वृक्षांची तोड न करता त्याचा कलात्मक उपयोग करून परिसराचे सौंदर्य वृद्धिंगत केले जाईल. आवश्यक त्या ठिकाणी वृक्ष लागवड व संवर्धन केले जाणार आहे. गोदा पार्क हा प्रकल्प नदीच्या काठावर असल्याने पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्याचा उपयोग जल क्रीडा (वॉटर पार्क) आणि संगीत कारंजांसाठी केला जाईल. नौका विहाराचा आनंद लुटता यावा म्हणून नौकानयनची व्यवस्था केली जाणार आहे. बाळ गोपाळांसाठी आगळेवेगळे ‘चिल्ड्रन्स पार्क’ आणि ज्येष्ठांसाठी नाना-नानी पार्क यांचाही अंतर्भाव केला जाणार आहे. बहुउद्देशीय सभागृह व सांस्कृतिक भवनची उभारणी करताना खुला रंगमंच, व्याख्यान व योगासन वर्गासाठी खास व्यवस्था होईल. शहराचे विलोभनीय दर्शन घेता यावे याकरिता उंच टेकडीवर प्रेक्षक गॅलरी उभारली जाईल. याशिवाय,‘मोनोरेल’, ‘लेझर शो’, वनौषधींची लागवड, उपहारगृह आदिंचा समावेश राहील, असे मूळ प्रस्तावात म्हटले आहे. राज यांच्या संकल्पनेत रिलायन्स फाऊंडेशन आणखी काय भर टाकणार, हे सादरीकरणाच्या माध्यमातून समोर येणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात अर्धा किलोमीटरचे क्षेत्र फाऊंडेशन विकसित करणार आहे. त्यावर महापालिकेने अभिप्राय दिल्यावर पुढील काम केले जाईल. गोदा पार्कवर प्रवेश विनामूल्य राहणार असला तरी वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरवासीयांना पैसे खर्च करावे लागतील.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
गोदा पार्कचे ‘राज’
गोदातीराला नवचैतन्य देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आणि जवळपास दहा वर्षांपासून केवळ स्वप्नातीत राहिलेला ‘गोदा पार्क’

First published on: 05-10-2013 at 08:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goda park special presentation in a presence of raj thakre