घरफोडय़ांचे सत्र सुरूच
महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन (मंगळसूत्र) खेचून पळणाऱ्या सोनसाखळी चोरांनी आता अंगावर सोन्याचे दागिने घातलेल्या पुरुषांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून ठाणे येथील आझादनगर परिसरात घडलेल्या घटनेवरून ही बाब उघड झाली आहे. तसेच या घटनेमध्ये धारदार वस्तूने हल्ला करून सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याने सोनसाखळी चोरांची हिंमत पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये घरफोडय़ांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसांत शहरात तीन ठिकाणी घरफोडय़ा घडल्या आहेत. सोनसाखळी चोरी तसेच घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांचा आता चोरटय़ांवर धाक राहिलेला नसल्याचे पुन्हा एकदा उघड होऊ लागले आहे.
ठाणे येथील रुणवाल इस्टेटमध्ये मकरंद मधुकर धारप (४६) राहतात. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मकरंद हे आझादनगर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरातून पायी जात होते. त्या वेळी मोटारसायकलवरून दोन जण आले, त्यापैकी पाठीमागे बसलेल्या एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांना अडविले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला असता, मकरंद यांनी त्याला विरोध केला. त्या वेळी मोटारसायकल चालविणाऱ्याने खाली उतरून त्यांच्या गळ्यावर धारदार वस्तूने हल्ला करून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हातातील अंगठी, असे सुमारे एक लाखाचे दागिने लुटून पोबारा केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव वाढू लागल्याने ठाणे पोलिसांनी विशेष मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्यामुळे या चोरटय़ांच्या शहरातील उपद्रवाला काहीसा आळा बसल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. तसेच आझादनगर परिसरातील घटनेमुळे सोनसाखळी चोरटय़ांची आता धारदार वस्तूने हल्ला करण्यापर्यंत मजल वाढू लागल्याचे उघड झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये घरफोडीच्या घटना सुरूच असून गेल्या दोन दिवसांत तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. मुंब्रा भागात राहणारे अब्दुल सत्तार रहीम शेख (४७) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे तीन लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. तसेच मुंब्रा येथील अमृतनगर भागातील शिवाजीनगरमध्ये राहणारे महमंद जमील शेख (३०) हे घरात कुटुंबासह झोपले होते. त्या वेळी चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या खिडकीची काच तोडून आत प्रवेश करून महमंद यांच्या पॅण्टच्या खिशातील ३५ हजारांची रोकड चोरून नेली. या दोन्ही घटनांप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर येथील बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सारिका संतोष शेलार (३२) यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे ८२ हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
सोनसाखळी चोरांची भीड चेपली
घरफोडय़ांचे सत्र सुरूच महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन (मंगळसूत्र) खेचून पळणाऱ्या सोनसाखळी चोरांनी आता अंगावर सोन्याचे दागिने घातलेल्या पुरुषांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली
First published on: 01-01-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold chain robbers cases are countinues