विदर्भातील महिला  किती सुरक्षित?
देश अथवा राज्य पातळीवर जे चित्र आहे तिच अवस्था यवतमाळ जिल्ह्य़ाचीही आहे. महिलांच्या सुरक्षेच्या संकल्पनेची व्याप्ती लक्षात घेता महिला रात्री एकटय़ा फिरू शकतील किंवा प्रवास करू शकतील, याची शाश्वती अजिबात देता येणार आहे, असे हे चित्र आहे.
राजकीय आणि सांस्कृतिकदृष्टय़ा जिल्हा फार जागरूक आहे, असे नेहमी गौरवाने सांगितले जात असले तरी दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील वाढीमुळे या जिल्ह्य़ाला अन्यायाचे हलाहलही प्राशन करावे लागत आहे. याच महिन्यात एस.टी.च्या पुसद-नागपूर बसमध्ये वाहकाशेजारी बसलेल्या एका महिलेसोबत वाहकाने दिवसाढवळ्या अश्लिल चाळे केल्यावर त्या वाहकाला महिलेने बसमध्येच चपलेने बदडून काढल्याची घटना घडली. बसमधील प्रवाशांसमोर महिलेशी अश्लिल चाळे करण्याची चालकाची हिंमत होते, याचा अर्थ त्याला कशाचाच धाक उरला नाही, हे स्पष्ट आहे. संतप्त प्रवाशांनी बस दारव्हा पोलीस ठाण्यात नेल्यावर वाहकाला अटक करण्यात आली. दिवसाढवळ्या प्रवाशांसमोर असे घडते तर प्रवासी नसलेल्या बसमध्ये एकटी महिला सुरक्षित प्रवास करू शकेल काय, या प्रश्नाचे उत्तर एस.टी. प्रशासनानेच दिले पाहिजे.
‘महिला सुरक्षित नाहीतच’ हे ठामपणे सांगता येईल, अशा घटनांची धक्कादायक नोंद झालेली आहे व त्यात सर्वात जास्त घटना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना आहेत. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या (मग ती एकटी असो की समूहाने) गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेणारे चोरटे मोटारसायकलने येतात अन् बिनधास्तपणे मंगळसूत्र तोडून नेतात. या प्रकारामुळे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्माही त्रस्त आहेत. ठाणेदारांची कानउघाडणी करणे, त्यांच्या बदल्या करणे, स्वत: ठाण्यात जाऊन उपनिरीक्षकासारखे काम करणे, हे सर्व प्रयोग शर्मा यांनी केले आहेत, पण मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. गंमत अशी की, महिलांनी सोन्याचे मंगळसूत्र घालूच नये, नकली घालावे, असा सल्ला देण्यात येतो यापेक्षा असुरक्षेचे दुसरे कोणते उदाहरण देता येईल.
‘आम्हाला संरक्षण द्या’ अशी मागणी करीत महिला संघटनांनी तर मोर्चा काढून जिल्हाधिकारी अश्विनकुमार मुदगल यांना एक निवेदन दिले आहे. क्रांती धोटे, पुष्पा तिडके, अलका कोथडे, उज्वला भाविक, माधुरी अराठे, सारिका ताजने, मनीषा काटे, गार्गी गिरटकर, किरण चुनारकर, रक्षा शेळके, मयंती वैद्य इ. सामाजिक कार्यकर्त्यां महिलांनी महिला संरक्षणाची मागणी केली आहे. कौटुंबिक छळाच्या, मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या, लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याच्या, बायकोचा खून केल्याच्या घटनांची संख्या कमी असली तरी अशा घटना सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद ठराव्यात, अशी स्थिती आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असली, शहरात जागोजागी सीटी स्कॅन कॅमेरे लावले असले आणि महिलांना संरक्षण देण्याचे सर्व प्रयत्न केले जातील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी म्हटले असले तरी महिलांना सुरक्षित वाटत नाही, हे कटू वास्तव आहे. आणखी एक धक्कादायक किस्सा असा की, नेरच्या एका कॉलेजातील प्राध्यापिकेने प्राचार्याविरुद्ध ‘छळाची तक्रार’ केली आहे. प्रकरण विद्यापीठाकडे गेले आहे. उच्च शिक्षण संस्थेत जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर सर्व सामान्य महिलांची दशा कथन न केलेलीच बरी, असे बोलले जात आहे.
चिमुकली सपन अद्याप बेपत्ताच
जिल्ह्य़ात नव्हे, तर राज्यात आणि विधिमंडळात गाजलेले व अजून गाजत असलेले प्रकरण म्हणजे सपना पळसरकर या ७ वर्षे वयाच्या मुलीचे बेपत्ता होण्याचे आहे. घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिच्या शोध घेण्याच्या मागणीसाठी उपोषण, धरणे, मोर्चे इ. सर्व प्रकार झाले. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी तर पन्नास हजार रुपये बक्षीस तिचा पत्ता देणाऱ्यास जाहीर केले आहे, पण सपनाचा पत्ता नाही.