प्रवाशांच्या सोयीकरिता स्वर्णजयंती एक्सप्रेसला पांढुर्णा स्थानकावर देण्यात आलेला थांबा येत्या ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. आठवडय़ातून दोन दिवस धावणाऱ्या १२८०३/ १२८०४ विशाखापट्टण-निझामुद्दीन स्वर्णजयंती एक्सप्रेसला गेल्या १० जुलैपासून सहा महिन्यांसाठी पांढुर्णा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला होता. आता हा थांबा येत्या ३० जूनपर्यंत आणखी सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर वाढविण्यात आला आहे.
दर मंगळवार व शनिवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी नागपूरला येणारी १२८०३ विशाखापट्टणम-निझामुद्दीन ही गाडी रात्री १.४७ वाजता पांढुर्णा येथे येऊन १.४८ वाजता रवाना होईल. तर दर बुधवार व रविवारी १२८०४ निझामुद्दीन- विशाखापट्टणम ही गाडी रात्री २० वाजता पांढुर्णा येथे येऊन एक मिनिटाने रवाना होईल.
ही गाडी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी नागपूरला येऊन ११.२५ वाजता पुढे रवाना होते.