बियाणे उद्योगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या महाराष्ट्र हायब्रीड सीड्स, अर्थात ‘महिको’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार रविवारी (दि. १५) जालना दौऱ्यावर येत आहेत. त्या दिवशी सकाळी १० वाजता ‘महिको’च्या दावलवाडी संशोधन केंद्राच्या परिसरात पालकमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित असणार आहेत.
‘महिको’ची स्थापना करण्यापूर्वीच या उद्योगाचे अध्यक्ष बद्रिनारायण बारवाले यांचे बियाणे उत्पादनक्षेत्रात आगमन झाले होते. सन १९६०च्या आसपास नवी दिल्लीतील भारत कृषक समाजाचे कृषी प्रदर्शन, तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थेस भेट देऊन परतल्यावर त्यांनी जालना परिसरात पुसा सावनी भेंडी बियाण्यांचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. सन १९६४ मध्ये ‘महिको’ची स्थापना केली व  गेली ५० वर्षे बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रयोग केले.
पाच दशकांपूर्वी अनुवंशशास्त्रातील प्रगत शोधामुळे कृषिक्षेत्रातील मोठय़ा बदलास सुरुवात करणारे संकरित बियाणे निर्माण होऊन हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘महिको’मुळे या क्षेत्रात जालना शहराची सर्वदूर ओळख झाली. ‘पुसा सावनी भेंडी’च्या नंतर मका, ज्वारी, बाजरीच्या संकरित बियाण्यांच्या उत्पादनामुळे जालना शहर ओळखले जाऊ लागले. संकरित बियाण्यांच्या नंतर ‘बी. टी. कॉटन’ या जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांमुळे ‘महिको’चे नाव चर्चेत आले.
एकेकाळी भारतातील शेतकरी स्वत:च्या शेतीतील धान्य पुढच्या वर्षी बियाणे म्हणून वापरीत असे. पुढे त्याची जागा संकरित बियाण्यांनी घेतली आणि आता तो जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा वापर करीत आहे. बियाणे उत्पादनाच्या या क्षेत्रातील बदलाशी ‘महिको’ संबंधित असून जालना शहर त्याचे साक्षीदार आहे.
बी. टी. म्हणजे या सम हा!
बी. टी. म्हणजे बॅसिलयस थुरिजिएन्सीस. हा मातीत आढळणारा सामान्य जिवाणू असून, त्याचा शोध जवळपास सहा दशकांपूर्वीचा आहे. या जिवाणूने तयार केलेली प्रथिने कापसावरील बोंडअळीच्या पोटात जाऊन तिच्या पचनसंस्थेवर हल्ला करतात. त्यानंतर काहीही खाता न आल्याने बोंडअळी जगू शकत नाही. ते जनुकच शास्त्रज्ञांनी सरळ कापसाच्या बियाण्यांत, म्हणजे पर्यायाने कापसाच्या पिकात घातले. सन २००२मध्ये केंद्र सरकारने बी. टी. कापसाच्या तीन जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यास मान्यता दिल्याने ‘महिको’चे नाव बियाणे क्षेत्रात अधिकच चर्चेत आले.