महाराष्ट्र राज्य पालिका कर्मचारी-संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला, परंतु स्थानिक पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवला आहे. १५ एप्रिलपर्यंत कर्मचारी असेच काम करणार आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, अशी माहिती गोंदिया शाखेचे अध्यक्ष छेदीलाल लक्ष्मण इमलाह यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात गोंदियाचे कर्मचारी सहभागी न होता कामावर होते. याबाबत विचारले असता येथील कर्मचारी संप पुकारण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य नसून पालिका व महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. संप पुकारण्यात आलेल्या संघटनेला केवळ पािठबा म्हणून आपण काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवत आहोत, अशी माहिती दिली, परंतु हे सुद्धा पालिकोंचेच कर्मचारी आहेत. त्यांच्या समस्यासंदर्भात संप पुकारण्यात आला.
गेल्या वर्षी झालेल्या संपात येथील सर्व कर्मचारी संपावर गेले होते. मग यावर्षी का नाही, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.
पालिकेचे सर्व कर्मचारी आज कामावर हजर होते व सर्वानी काळ्या फिती लावून दिवसभर काम केले. असे असले तरी येथील अनेक कर्मचारी हे पुकारण्यात आलेल्या संपाच्या माहितीपासून अलिप्त होते, तर काहींमध्ये संपाबाबत उदासीनता आढळून आली.
 केवळ संघटनेला पाठिंबा म्हणून त्यांनी काळ्या फिती लावल्याचे लक्षात आले. हा संप प्रमुख १४ मागण्यांसाठी करण्यात आला असून या मागण्यांची पूर्तता १५ एप्रिलपर्यंत न झाल्यास गोंदियाचे कर्मचारीही बेमुदत संप पुकारतील, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यव्यापी संपात गोंदियाचे कर्मचारी सहभागी न होता काळ्या फित लावून आपले कार्य करतील व त्यांना संपावर जायचे झाल्यास ३ दिवसांपूर्वी माहिती देण्यात येईल, असे निवेदन संघटनेने गोंदिया विधानसभा मतदार संघाचे आमदार, विधान परिषदेचे आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषदेचे अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटना यांना दिले आहे.
या संपापासून अग्निशमन व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दूर असल्याची माहिती आहे. येथील  कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.

पािठबा की, पगार कपातीचा धसका?
या राज्यव्यापी संपाला केवळ पािठबा म्हणून गोंदियाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्याा फिती लावल्या, परंतु ते संपावर गेले नाहीत. याबाबत त्यांनी संप हा दुसऱ्या संघटनेचा असल्याचे कारण सांगितले असले तरी गेल्या वर्षी ८ एप्रिलला हे कर्मचारी २८ दिवसांच्या संपावर गेले होते. दरम्यान, त्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यावर्षीही पगार कपात होणार असल्याचा धसका कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळेच त्यांनी औपचारिकता म्हणून काळी फित लावून पािठबा देत संप नाकारला, अशा चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहेत.