पाणी नियोजन, मृदसंधारणाच्या कामांची फलश्रुती
मृदसंधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे २०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, याचे आदर्श उदाहरण जालना तालुक्यातील कडवंची गावाने दाखवून दिले आहे. इतर गावांसाठी हे गाव रोल मॉडेल ठरावे.
गेल्या पावसाळ्यात जालना जिल्ह्य़ात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. त्यातही जालना तालुक्यातील कडवंची गावात यापेक्षाही कमी पाऊस झाला. परंतु या गावच्या परिसरातील शेते मार्चमध्येही हिरवी आहेत. या परिसरात अडीचशेपेक्षा अधिक शेततळी आहेत. यातील जवळपास २०० तळ्यांमध्ये मार्च महिन्यातही मुबलक पाणीसाठा आहे. गावच्या परिसरात १० शेडनेट, जवळपास दीडशे विहिरी आहेत. यापैकी बहुतेक विहिरींमध्ये पाणी आहे.
जालना शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर सिंदखेड राजा रस्त्यावर हे गाव आहे. या गावातील मृदसंधारण व पाण्याच्या नियोजनाची ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापक एस. एम. खोसे, जालना कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता पंडित वासरे, पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष भगवानराव क्षीरसागर व सचिव चंद्रकांत क्षीरसागर यांनी बुधवारी पत्रकारांना माहिती दिली. मृदसंधारण, पाणलोट विकास, शेततळी, नालाबांध, बागायती पिके आदींची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर वासरे म्हणाले की, जालना कृषी विज्ञान केंद्राने इन्डो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १९९४ मध्ये कडवंची गावात काम सुरू केले.
मृदसंधारणसाठी डोंगर उतार व पडिक जमिनीवर सलग समतल चर, खासगी वहिती जमिनीवर बांधबंदिस्ती, लहान-मोठे दगडी आणि सिमेंटचे नालाबंधारे आदींमुळे विहिरीतील पाणीपातळी वाढली. तसेच ३५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर डाळिंब, द्राक्ष बागायती झाली. खोसे म्हणाले की, नाबार्डच्या माध्यमातून जवळपास एक कोटीचा खर्च या गावात पाणलोट विकास कार्यक्रमासाठी झाला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळाल्यामुळे कडवंची परिसरात अडीचशेपेक्षा अधिक शेततळी निर्माण झाली आहेत. पाणलोटामुळेच या गावातील शेततळी व विहिरींमध्ये मार्चमध्येही पाणी असून द्राक्षासारखी बागायती पिकेही चांगली तग धरून आहेत.
पाणलोट विकासामुळे गावातील बागायती क्षेत्र वाढून शेतीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. मृदसंधारणामुळे गावातील जवळपास अडीचशे हेक्टर पडिक जमीनही लागवडीखाली आली आहे. हंगामी व बारमाही सिंचनक्षेत्रात वाढ झाल्याने पिकांचे उत्पादन व उत्पन्नातही भरीव वाढ झाली. काही अपवाद वगळता बहुतेक शेतकरी आता गावात नव्हे, तर आपल्या शेतात वास्तव्यास गेले आहेत. गावातील शासकीय जमिनीवरही ग्रामस्थांनी झाडे लावून त्याची निगा ठेवली आहे. पाणलोट विकास समितीचे स्थानिक अध्यक्ष भगवानराव क्षीरसागर यांनी पाणलोट विकास कार्यक्रम आणि शेततळ्यांमुळे शेतीचा झालेला विकास, तसेच ग्रामस्थांचे वाढलेले उत्पन्न या संदर्भात माहिती दिली.