सिंचन घोटाळ्यातील कामाच्या वाढीव खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या नेतृत्वाखालील मुंबई महानगरपालिकेलाही आता कामाच्या वाढीव खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. कारण, पालिकेच्या अखत्यारीत गोरेगावमध्ये सुरू असलेल्या एका उड्डाणपुलावरील खर्च पाच वर्षांत तब्बल २०० टक्क्यांनी वाढल्याचे उघडकीस आले आहे.
गोरेगावच्या राम मंदिर मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्ग या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने २००९-१० साली या उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. गोरेगावकरांबरोबरच पश्चिम उपनगरात राहणाऱ्या रहिवाशांचा पूर्व द्रुतगती मार्गापर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी बांधण्यात आलेला हा पूल तब्बल पाच वर्षे रखडला आहे. तसेच, या पाच वर्षांत पुलावरील खर्च तब्बल २०० टक्क्यांनी वाढला आहे. २००९-१०मध्ये काम सुरू करताना या पुलाचा प्रस्तावित खर्च ६६ कोटी रुपये इतका होता. परंतु, प्रत्यक्षात काढण्यात आलेली वर्क ऑर्डर म्हणजे कामाची निविदा प्रस्तावित खर्चापेक्षा तीस कोटींनी जास्त म्हणजे तरी ९९ कोटी ७१ लाखांची होती. आता या पुलाकरिता तब्बल २५५ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १४५ कोटी खर्च झाले आहेत, असा खुलासा महानगरपालिकेने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला उत्तर देताना केला आहे. यावर  ‘भविष्यातील गोरेगावमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुलाच्या आराखडय़ात बदल करण्यात आले असून त्याची उंची काही ठिकाणी वाढविण्यात आल्यामुळे पुलाचा खर्च वाढला,’ असा खुलासा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नव्या आराखडय़ानुसार हा पूल आता एस. व्ही. मार्गालाही जोडण्यात येणार आहे, हे जरी खरे असले तरी त्यामुळे इतका खर्च कसा काय वाढतो, असा प्रश्न आहे.पुलाच्या उंची किंवा लांबीबाबतचा विचार पाच वर्षे आधीच का झाला नाही, असा प्रश्न आहे. तसेच, कामाचा खर्च ६६ कोटी काढला गेला असताना प्रत्यक्ष कामाची निविदा ९५ कोटी रुपयांची कशी काय निघते. तसेच, केवळ उंचीकरिता किंवा लांबी वाढली म्हणून खर्च १६० ते १७० कोटी रुपयांनी कसा काय वाढतो, असा प्रश्न ही माहिती मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केला आहे. याचा अर्थ या पुलाचा आराखडा ठरविणारा तत्कालीन अधिकारी चुकीचा होता काय, असा सवाल त्यांनी केला आहे. चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून संबंधितांच्या चौकशीची मागणी केली आहे.
अतिक्रमणांमुळे पुन्हा ‘ब्रेक’
गेली पाच वर्षे रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या मार्गात ‘वखारिया इंडस्ट्रियल इस्टेट’मधील ८० दुकाने आली आहेत. परिणामी पुलाच्या कामाला पुन्हा ब्रेक बसला आहे. या दुकानदारांना पर्यायी जागा देण्यात आल्याने ती हटविण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. हा उड्डाणपूल मे, २०१५मध्ये पूर्ण करण्याची पालिकेची योजना आहे. परंतु, जोपर्यंत ही दुकाने हलविली जात नाहीत, तोपर्यंत पुलाचे काम वेग घेणार नाही. तसेच, आतापर्यंत झालेले बांधकाम पाहता आणखी वर्षभर तरी या पुलावरून प्रवास करणे गोरेगावकरांच्या नशिबी नाही.
रेश्मा शिवडेकर, मुंबई